(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrapur News : चंद्रपुरातील चिपराळा परिसरातील जंगलात आढळला वाघिणीचा मृतदेह, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट
Chandrapur News : चंद्रपुरातील चिपाराळा परिसरातील जंगलामध्ये एका वाघिणीचा मृतदेह आढळला असून या वाघिणीच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
चंद्रपूर : चंद्रपुरातील (Chandrapur) चिपाराळा परिसरातील जंगलामध्ये एका वाघिणीचा (Tiger) मृतदेह (Death) आढळून आला आहे. दरम्यान या वाघिणीचे वय अंदाजे सहा ते सात वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. या वाघिणीचे अवयव जरी शाबूत असले तरीही तिचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेमध्ये सापडला आहे त्यामुळे या वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तर या संपूर्ण घटनेचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात येत आहे. त्यानंतर या वाघिणीच्या मृत्यूचे कारण समजू शकेल असं सांगण्यात येतय.
भद्रावती वनपरिक्षेत्रामध्ये चिपराळा नियतक्षेत्राच्या कक्ष क्रमांक 211 मध्ये या वाघिणीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली. दरम्यान वनविभागाचे कर्मचारी कक्ष क्रमांक 211 मध्ये गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना या वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या संबंधीची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहचून वनविभागाने पाहणी देखील केली.
वाघिणीचे केले शवविच्छेदन
दरम्यान डॉक्टरांच्या उपस्थित या वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले. चंद्रपुरातील ट्रांझिट ट्रीटमेंन्ट सेंटरमध्ये तिचे शवविच्छेदन केले. यावेळी विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनसरंक्षक आदेशकुमार शेडगे, व्हि. व्हि. शिंदे, वनरक्षक जे. ई. देवगडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे आणि डॉ. कुंदन पोहचलवार, बंडुजी धोतरे आदी तज्ज्ञ उपस्थित होते. त्यानंतर या वाघिणीच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले. परंतु या वाघिणीचे दात, नखं आणि मीशा हे अगदी चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. पण मृत्यूचे ठोस कारण हे शवविच्छेदानाचा अहवाल आल्यानंतरच कळेल.
वाघिणीच्या मृत्यूने खळबळ
या वाघिणीच्या मृत्यूमुळे चंद्रपुराच्या जंगल परिसरामध्ये एकच खळबळ माजली. त्यामुळे वनविभागाकडून आता योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्हा हा वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटक वाघांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. पण वाघ आणि वाघिणींचे जर असे मृतदेह आढळून येत असतील तर ही बाब गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या वाघिणीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाकडून योग्य ती पावलं उचलण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा सारखा मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या लक्षणीय असून पर्यटकांसाठी ही विशेष आकर्षणाची बाब आहे. पण त्यासाठी वाघांचे संवर्धन करणं देखील तितकचं महत्त्वाचं असणार असल्याचं म्हटलं जातय.
हेही वाचा :
Tadoba Tiger Reserve : आता वाघाचं दर्शन पुन्हा होणार! ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला सुरुवात