(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
अहमदपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे ही बस निघाली होती, त्यावेळी, अंबाजोगाई-बीड मार्गावरील चंदन सावरगाव येथे बसचा अपघात झाला
बीड : पुणे जिल्ह्यात एसटी बस अपघाताची घटना घडली असताना, आता बीड (Beed) जिल्ह्यातही बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अंबाजोगाई-बीड मार्गावरील चंदन सावरगाव येथील हॉटेल मोरया जवळ एसटी बसचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. अहमदपूर-संभाजीनगर ही एसटी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात बसमधील 16 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. बस चालकाकडून रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अहमदपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे ही बस निघाली होती, त्यावेळी, अंबाजोगाई-बीड मार्गावरील चंदन सावरगाव येथे बसचा अपघात झाला. या एसटी मधून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. मात्र, दुर्घटनेत त्यातील 16 जखमी झाले आहेत. जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्या आले असून तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. तसेच, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देखील काही जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, या अपघातात एसटीचा चालक ही गंभीर जखमी झाला आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील भोर येथएही अशीच अपघाताची घटना घडली असून त्यात 42 प्रवासी जखमी झाले आहेत.
पुण्यातही बसचा भीषण अपघात
रस्ते अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून एसटी महामंडळाच्या बसचे (Bus) देखील सातत्याने अपघात होत असल्याचे दिसून येते. अनेकदा बसची दूरवस्था किंवा खराब रस्ता हे अपघाताचे मूळ कारण असते. आता, पुण्याच्या (Pune) भोरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवासी घेऊन येत असताना, बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन एका वळणावर बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास एका वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून बस रस्ता सोडून थेट शेतात घुसली. या अपघातात बसमधील 42 किरकोळ जण जखमी झाले असून 3 जण गंभीर जखमी आहेत.
हेही वाचा
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर