Mumbai Measles Disease : मुंबईत गोवरचे रुग्ण वाढले, केंद्रीय पथक पाहणी करणार, गोवरची लक्षणे, उपाय काय?
Mumbai Measles Disease : मुंबईला गोवर आजाराचा विळखा वाढतच आहे. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 109 रुग्णांची नोद झाली होती. तर ऑक्टोबर महिन्यात मुंबईत 60 गोवरचे रुग्ण आढळले होते तर सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या 24 इतकी होती.
Mumbai Measles Disease : मुंबईत (Mumbai) सध्या गोवर आजाराची ( Measles Disease) साथ पसरली आहे. केंद्र सरकारने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीकडून आज फैलाव वाढलेल्या विभागात आढावा आणि पाहाणी दौरा केला जाणार आहे.
मुंबईत गोवरचा विळखा वाढता
मुंबईला गोवर आजाराचा विळखा वाढतच आहे. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 109 रुग्णांची नोद झाली होती. तर ऑक्टोबर महिन्यात मुंबईत 60 गोवरचे रुग्ण आढळले होते तर सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या 24 इतकी होती. तर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गोवंडीमध्ये तीन बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उच्चस्तरिय पथकं तैनात करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून उपाययोजना
दरम्यान गोवर आजाराची साथ लक्षात घेऊन मुंबई महापालिकेकडून उपाययोजनेला सुरुवात झाली आहे. याशिवाय ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे, पाहणी आणि लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या सोबतच सामाजिक संघटनांच्या मार्फत देखील प्रादुर्भाव वाढलेल्या भागात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. चांगला आहार आणि स्वच्छता राखत, लहान मुलांसाठी असलेले लसीकरण करण्याचं आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केली आहे.
गोवर हा विषाणूपासून पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवर आजार सामान्यत: लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात झालेला आढळतो. तर काहीवेळा प्रौढांनाही हा आजार होऊ शकतो. गोवर आजार एकदा झाल्यास पुन्हा तो त्या व्यक्तीला होत नाही.
गोवर आजाराची कारणे
गोवर हा आजार Paramyxovirus च्या संसर्गामुळे होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे जाणवू लागतात.
गोवर आजाराने संक्रमित व्यक्ती खोकला किंवा शिंकला तर त्यामधून विषाणू हवेत पसरतात आणि या विषाणूच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना गोवर आजार होतो.
गोवरचे लक्षणे
- सुरुवातीला खोकला, ताप, सर्दी होणे
- डोळ्यांची जळजळ होणे
- डोळे लाल होणे
- घसा दुखणे
- तोंडाच्या आतील बाजूला पांढऱ्या रंगाचे स्पॉट जाणवणे
- अंग दुखणे
ही लक्षणे सुरुवातीला जाणवतात. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी चेहऱ्यावर आणि मग पोट तसंच पाठीवर लालसर बारीक पुरळ उठतात.
गोवर आजारावरील उपचार
गोवर आजारावर विशेष उपचार केले जात नाही. रुग्णांमधील लक्षणांवरुन उपचार केले जातात, जसं की ताप, सर्दी, खोकला असल्यास त्यावरील औषध दिलं जातं. साधारणपणे 8 ते 14 दिवसात ताप कमी होऊन पुरळ सुद्धा कमी होतं. यावेळी रुग्णाने विश्रांती घेऊन हलका आहार घेणं आवश्यक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
VIDEO : मुंबईत गोवरचे रुग्ण वाढले
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )