Health Tips : ब्रेकफास्ट टाळण्यापूर्वी हे नक्की वाचा; कारण....
अनेकदा घाईगडबडीमध्ये ब्रेकफास्ट न करण्याचं सत्र सुरु राहतं आणि पुढं जाऊन ही सवयच लागते. पण, याच सवयीचे शरीरावर काही वाईट परिणामही होतात. जाणून घ्या ब्रेकफास्ट न करण्याचे तोटे आहेत तरी काय...
मुंबई : दिवसाची सुरुवात अगदी चांगली आणि आरोग्यदायी झाली, की मग पुढचा संपूर्ण दिवसच उत्साही आणि आनंददायी जातो. या सुरुवातीमध्ये पोटाची भूक भागणंही तितकंच महत्त्वाचं. असं म्हणतात की सकाळची न्याहारी म्हणजे दिवसातील सर्वात महत्त्वाचं अन्नग्रहणाचं सत्र. न्याहारी, नाश्ता, नास्ता किंवा मग ब्रेकफास्ट, प्रत्येकाच्या सोयीनुसार ही नावं.
आरोग्यदायी आणि सुदृढ शरीरासाठी हा ब्रेकफास्ट म्हणजे जणू एका अविरत चालणाऱ्य़ा इंजिनमध्ये टाकलं जाणारं तितकंच चांगलं इंधन. ज्यामुळं हे शरीररुपी इंजिन अगदी सुरळीत चालतं. ब्रेकफास्ट करण्याचे तसे अनेक फायदे आहेत. त्यातही काही पोषक पदार्थांचं सेवन केल्यास त्यामाध्यमातून शरीरासाठीची आवश्यक उर्जा सात्तत्यानं पुरवली जाते. धान्य, पोहे, इडली, दलिया, अंड अशा पदार्थांचा समावेश असल्यामुळं हा परिपूर्ण आहार ठरतो. त्यामुळं ब्रेकफास्ट कधीही टाळू नका असाच सल्ला कायम देण्यात येतो. ब्रेकफास्ट टाळल्यामुळं त्याचे थेट परिमाम शरीरावर होतात. चला जाणून घेऊया, काय आहेत ते परिणाम...
हृदयरोगांचं कारण...
आरोग्यदायी असा ब्रेकफास्ट करणाऱ्यांमध्ये हृदयरोगाचा धोका अतिशय कमी असतो. तर, ब्रेकफास्ट न करणाऱ्यांमध्ये हृदयरोग आणि इतरही आरोग्याचे प्रश्न उदभवतात.
टाईप 2 मधुमेहाचा धोका...
हार्वर्ड य़ुनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनं केलेल्या एका निरीक्षणातून खाण्याच्या सवयी आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यांच्यातील नातं समोर आलं. जवळपास सहा वर्षांसाठीच्या या निरीक्षण मोहिमेत तब्बल 46 हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या निरीक्षणानंतर समोर आलेले निकाल हे धक्कादायक होते.
ब्रेकफास्ट breakfast न करण्याची सवय असणाऱ्या महिलांना टाईप 2 मधुमेहाचा सर्वाधिक धोका असल्याची बाब समोर आली. तर, नोकरीमध्ये व्यग्र असणाऱ्या आणि सकाळचं भोजन न करणाऱ्या महिलांमध्ये टाईप 2 मधुमेहाचा धोका 54 टक्के असल्याची बाब समोर आली.
स्थूलतेचं कारण....
अनेक निरीक्षणांतून हेसुद्धा लक्षात आलं आहे की, ब्रेकफास्ट न करणं हे स्थुलतेचं कारणंही ठरु शकतं. त्यामुळं वजन कमी करायच्या विचारात असाल तर ब्रेकफस्ट न करण्याचा विचार सोडून द्या.
केसगळतीचं कारण....
केसांवर तुमचं प्रेम असेल तर ब्रेकफास्ट कधीही टाळू नका. न्याहारी न केल्यामुळं शरीरातील प्रोटीनचं प्रमाण कमी होतं. याचे थेट परिणाम हे Keratin स्तरावर होतात. या घटकाभावी केसांची वाढ खुंटते आणि हेच केसगळतीचं कारण ठरतं. त्यामुळं घनदाट आणि मजबूत केसांसाठी प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट नक्की करा.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )