Obesity: वजन वाढतयं..बिनधास्त राहणं पडेल महागात! नियमित आरोग्य तपासणी करता का? तज्ज्ञ सांगतात...
Obesity: तज्ज्ञ सांगतात, जास्त वजन दिसायला सामान्य वाटू शकते, पण आतून शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो, जाणून घ्या

Obesity: भारतामध्ये स्थूलतेची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अनेक जास्त वजन असलेल्या व्यक्तींना स्वतःला ठणठणीत वाटते आणि ते स्वतःला निरोगी समजतात. मात्र, शरीरातील अतिरिक्त चरबी हृदय, यकृत (लिव्हर) आणि स्वादुपिंड (पॅनक्रियास) यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करू शकते. तुम्हाला माहिती आहे का? मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, थायरॉईड असंतुलन आणि व्हिटॅमिनची कमतरता हे आजार सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणांशिवाय विकसित होऊ शकतात. याबाबत महत्त्वाची माहिती देत आहेत. पुणे येथील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय येथील बॅरियाट्रिक सर्जन, डॉ. शशांक शहा... जाणून घ्या...
जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी खूप गरजेची....
डॉक्टर सांगतात, जास्त वजनामुळे मधुमेह, हृदयविकार, फॅटी लिव्हर आणि हार्मोनल असंतुलन यांचा धोका वाढतो. नियमित हेल्थ चेक-अप केल्याने आजार लवकर ओळखता येतात आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते. त्यामुळे जर तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्ही स्थूल असाल, तर तज्ज्ञांच्या संपर्कात राहणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे योग्य पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. खालील महत्त्वाच्या टिप्सनुसार स्थूलतेवर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. म्हणूनच जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. नियमित रक्त तपासण्या केल्याने स्थूलतेमुळे निर्माण होणाऱ्या लपलेल्या समस्या ओळखता येतात आणि त्यावर वेळेवर उपचार करता येतात.
महत्त्वाच्या तपासण्या ज्या दुर्लक्षित करू नयेत
HbA1c (रक्तातील साखरेची तपासणी): ही तपासणी मागील तीन महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेचे प्रमाण दर्शवते. जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स आणि टाइप २ मधुमेहाचा धोका जास्त असतो. HbA1c वाढलेले असल्यास लक्षणे दिसण्यापूर्वीच प्रीडायबेटीस किंवा मधुमेहाची शक्यता कळू शकते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी ही तपासणी करणे योग्य ठरते.
लिपिड प्रोफाइल: या तपासणीत LDL (वाईट कोलेस्ट्रॉल), HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण तपासले जाते. स्थूलतेमुळे वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढतात, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.
लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT): जास्त वजनामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. LFT द्वारे यकृताचे आरोग्य तपासता येते आणि चरबी साचल्यामुळे होणारे सुरुवातीचे नुकसान ओळखता येते.
थायरॉईड फंक्शन टेस्ट: थायरॉईड हार्मोन्स शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रित करतात. थायरॉईड कमी कार्यरत असल्यास (हायपोथायरॉईडीझम) वजन वाढणे, थकवा आणि मेटाबॉलिझम मंदावणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे थायरॉईड तपासणी नियमितपणे करणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डी पातळी: जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. यामुळे सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात व मानसिक ताण वाढू शकतो.
- स्थूलतेकडे दुर्लक्ष करू नका वेळीच योग्य पावले उचला.
- नियमित तपासण्यांसोबतच ताज्या फळे आणि भाज्यांनी समृद्ध पौष्टिक आहार घ्या,
- गरज असल्यास व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्या, पुरेशी झोप घ्या आणि दररोज व्यायाम करा.
- वजन कमी करण्यासाठी आणि स्थूलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्य महत्त्वाचे आहे.
- वेळेवर तपासणी, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे मोठे आजार टाळता येतात.
- आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्याची काळजी घ्या.
हेही वाचा
Health : सर्दी-खोकला झाल्यावर ब्रँडी किंवा रम पिणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )





















