(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women Health : महिलांनो, वेळीच तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या; अन्यथा 'या' गंभीर आजारांचा वाढता धोका; वाचा तज्ज्ञांचं म्हणणं
Women Health : वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेतल्यास महिलांमध्ये गंभीर आजारांचा धोका वाढतो.
Women Health : आपल्याला जर अनेक आजारांपासून सुरक्षित राहायचं असेल तर आपल्या आरोग्याची काळजी (Health Tips) घेणं गरजेचं आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता राखणे. ज्याप्रमाणे आपण आपल्या हाता-पायांची, चेहऱ्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे योनीमार्गाची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. स्वच्छतेबाबत योग्य जागरुकता किंवा काळजी न घेतल्यास बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो तसेच महिलांमध्ये (Women Health) अनेक आजार होतात. जे घातक ठरू शकतात. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेण्यावर तज्ज्ञांचा भर आहे.
महिलांनी खाजगी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये. जर महिलांना याविषयी माहिती नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अन्यथा काही आजार शरीराच्या आत हळूहळू वाढू लागतात. हे आजार सायलेंट किलरसारखे काम करू शकतात.
UTI संसर्ग गंभीर असू शकतो
वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने UTI (मूत्रमार्गाचा संसर्ग) संसर्ग होऊ शकतो. ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसून येते. याची वेळीच काळजी न घेतल्यास हा संसर्ग किडनीपर्यंत पोहोचून परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका (सर्वाईकल कॅन्सर)
स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य कर्करोगाच्या प्रकारांपैकी एक म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. स्त्रियांमध्ये सर्वाईकल कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या 25 टक्के केसेस भारतात होतात. सर्वात धोक्याची गोष्ट म्हणजे या कॅन्सरच्या बहुतांश केसेसमध्ये तो शेवटच्या टप्प्यावर आढळून येतो, कारण स्त्रिया त्याच्याशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि हा आजार शरीरात बराच काळ वाढत राहतो.
डॉक्टर काय म्हणतात?
या संदर्भात बोलताना डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे मुख्य कारण एचपीव्ही (HPV) विषाणू आहे. ज्या महिला आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात त्यांना या कर्करोगाचा धोका जास्त असतो. त्यामुळेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.
अशा प्रकारे वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या
सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे महिलांनी आपल्या शरीरातील आतल्या भागाची विशेष काळजी घ्यावी. याशिवाय बाथरूमला गेल्यावर योनीमार्ग ओला ठेवू नका. विशेषत: मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखा. यासाठी पॅड 4 ते 6 तासांच्या अंतराने बदलले पाहिजेत. तसेच, तुमच्या प्रायव्हेट पार्टचे केस वेळोवेळी ट्रिम करत राहा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.