Britain Election Result : ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
Britain Election Result : ब्रिटनमध्ये तब्बल 14 वर्षानंतर सत्तांतर झालं आहे. लेबर पार्टीच्या किएर स्टार्मर यांची पंतप्रधान पदी निवड झालीय.
लंडन : ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. लेबर पार्टीनं (Labour Party) 14 वर्षानंतर सत्तांतर घडवून आणलं. किएर स्टार्मर (Keir Starmer) यांच्या नेतृत्त्वातील लेबर पार्टीनं 412 जागा जिंकल्या. तर,ऋषी सुनक (Rishi Sunak) हुजूर पक्षाला 122 जागा मिळाल्या. तर लिबरल डेमोक्रॅटसला 1923 नंतर सर्वाधिक 71 जागा मिळाल्या. ब्रिटनच्या (Britain Election Result) संसदेची सदस्यसंख्या 650 इतकी आहे. स्कॉटिश नॅशनल पार्टीला 10 आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांना मिळून 31 जागा मिळाल्या आहेत.
ब्रिटनमधील मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या निवडणुकीत झालेला पराभव स्वीकरला आहे. कन्झर्वेटीव्ह पक्षाची या निवडणुकीत मोठी घसरण झाली. किएर स्टार्मर यांच्यावर विविध देशांच्या प्रमुखांनी या विजयाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. लेबर पार्टीनं 1997 नंतर पुन्हा एकदा चारशे जागांचा टप्पा पार केला आहे. लेबर पार्टीला 1997 मध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी पक्षाचे नेते टोनी ब्लेअर होते. पक्षानं त्यावेळी 419 जागा मिळवल्या होत्या. तर हुजूर पक्षाला 165 जागा मिळाल्या होत्या.
ऋषी सुनक यांनी विजय मिळवला आहे. तर माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांना वेस्ट नॉरफॉक मधून पराभव स्वीकारावा लागला आहे. लिझ ट्रस यांनी सप्टेंबर 2022 मध्ये पंतप्रधान पद स्वीकारलं होतं. मात्र, पुढच्या सहा महिन्याच्या आतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ऋषी सुनक यांनी उत्तर इंग्लंडमधील रिचमंड आणि नॉर्थालर्टनं मधून 47.5 टक्के मत मिळवतं विजय मिळवला आहे.
सार्वत्रिक निवडणुकीतील विजयानंतर किएर स्टार्मर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण करुन दाखवल्याचं म्हटलं. आपण यासाठी प्रचार केला होता, यासाठी लढाई लढली होती. यासाठी मतदान केलं होतं, आता निकाल देखील आपल्या समोर असल्याचं किएर स्टार्मर म्हणाले. स्टार्मर म्हणाले ही बदलेली लेबर पार्टी असून देशसेवेसाठी यार आहे.
ब्रिटनच्या निवडणुकीत झालेला पराभव ऋषी सुनक यांनी स्वीकारला आहे. निवडणुकीतील हुजूर पक्षाची खराब कामगिरीची जबाबदारी ऋषी सुनक यांनी घेतली तर किएर स्टार्मर यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
650 सदस्यांच्या ब्रिटनच्या संसदेत बहुमतासाठी 326 जागांची आवश्यकता असते. लेबर पार्टी आघाडीवर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ऋषी सुनक यांनी राजीनामा दिला.
ब्रिटनमध्ये एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरताना पाहायला मिळालं. ब्रिटनमध्ये 650 पैकी लेबर पार्टीला 431 जागा मिळतील असा अंदाज YouGov नं वर्तवला होता. तर, हुजूर पक्षाला 102 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला गेला होता. किएर स्टार्मर यांच्या विजयासह तब्बल 14 वर्षानंतर हुजूर पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे. या दरम्यान पाच पंतप्रधानांनी काम केलं. डेविड कॅमेरुन, टेरेसा मे, बोरिस जॉनसन, लिझ ट्रस आणि ऋषी सुनक पंतप्रधान बनले.
संबंधित बातम्या :