Health Tips : 'या' सवयींमुळे तुमच्या कानाला त्रास होतो; कानाची काळजी घेण्यासाठी आजपासूनच 'हे' बदल करा
Health Tips : हेडफोन आणि इअरबड्सच्या अतिवापराशिवाय इतरही अनेक सवयी आहेत ज्यांचा आपल्या कानावर वाईट परिणाम होतो.
Health Tips : आपल्या आरोग्याची (Health) काळजी घेण्यासाठी आपण सतत काही प्रयत्न करतो. निरोगी राहण्यासाठी, निरोगी आहार घेणे, व्यायाम करणे तसेच, केसांसाठी (Hair Care Tips) विविध प्रोडक्ट्सचा वापर करणे. पण या सगळ्यात आपण काही अवयवांची काळजी घ्यायला विसरतो, त्यातला एक अवयव म्हणजे आपला कान (Ear). तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका संशोधनानुसार, हेडफोन आणि इअरबडचा जास्त वापर आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यामुळे 12 ते 34 वर्ष वयोगटातील सुमारे 135 कोटी लोकांमध्ये ऐकण्याची क्षमता (श्रवणशक्ती) कमी होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे वेळीच कानाच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. हेडफोन आणि इअरबड्सच्या अतिवापराशिवाय इतरही अनेक सवयी आहेत ज्यांचा आपल्या कानावर वाईट परिणाम होतो.
अशा काही सवयी आहेत ज्यांचा आपल्या कानावर वाईट परिणाम होतो आणि त्या कशा सुधारायच्या या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कॉटन बड्सचा वापर
अनेक लोक कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात आणि खाज सुटत असल्यास कॉटन बड्स किंवा ते उपलब्ध नसल्यास चाव्या यांसारख्या गोष्टींनी खाज शांत करतात. ज्यामुळे कानाला इजा होऊ शकते. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. कारण कानांच्या आतील भागाची स्वच्छता केल्याने मेण कानाच्या पडद्यात खोलवर जाते. अशा परिस्थितीत काही वेळा कानाचा पडदाही खराब होऊ शकतो. यामुळे कान दुखतात तसेच कमी ऐकू येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे कानात कॉटन बड्सचा वापर करू नका.
मोठ्या आवाजात गाणी ऐकणे
आजकाल, लोकांना मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याचं वेड लागलं आहे. काम करताना असो किंवा गाडी चालवताना मोठ्या आवाजात गाणी ऐकणं हा एक छंदच झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, ही चूक वेळीच सुधारली नाही, तर व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे, फक्त 60% किंवा त्यापेक्षा कमी आवाजात गाणी ऐकण्याचा सल्ला दिला जातो, शक्य असल्यास इअरबड्सऐवजी हेडफोन वापरा, कारण इअरबड तुमच्या कानाच्या पडद्याच्या जवळ असतात.
चेकअप न करणे
कानात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आपण घरगुती उपायांचा वापर करतो. पण, हे चुकीचे आहे. त्यामुळे कानात काही समस्या आल्यास ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तसेच, शरीराच्या नियमित तपासणीप्रमाणेच कानांच्या आरोग्यासाठी ते तपासत राहणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या कानाला योग्य विश्रांती न देणे
जर तुमचे काम असे असेल की तुम्हाला हेडफोन लावावे लागतील आणि तुम्ही दिवसभर अशा ठिकाणी काम करत असाल जिथे मोठा आवाज असेल. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमच्या कामातून किमान 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि तुमच्या कानाला विश्रांती द्या.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.