Urfi Javed : चित्रा वाघ यांच्या विरोधात उर्फी जावेदची अद्याप लेखी तक्रार नाही : सूत्रांची माहिती
Urfi Javed : उर्फी जावेद ही महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे ऑनलाईन तक्रार करणार असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आहे आहे.
Urfi Javed : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण उर्फी जावेद महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे ऑनलाईन तक्रार करणार असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आले आहे.
उर्फी जावेदने आज महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकरणकर यांची भेट घेतली. यावेली तिने घातलेल्या टीशर्टवर लिहिलेले इंग्रजी वाक्य विशेष चर्चेत होतं. Not A Nepo baby (आपण कोणत्याही सेलिब्रिटीचं मुल नव्हे) अशा आशयाचं वाक्य टीशर्टवर लिहिण्यात आलं असल्याचं पाहायला मिळालं. आपल्याला कोणताही वारसा नसताना देखील आपण स्वतःच्या पायावर उभे असून आपण आपली लढाई देखील स्वतःच लढत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न उर्फी जावेदने यानिमित्ताने दिला असल्याचं पाहायला मिळालं.
तोकड्या कपड्यावरून चित्रा वाघ यांनी उर्फीला सुनावलं होतं. त्यानंतर दोघींमधील वाद चांगलाच रंगला. उर्फी जावेदने ट्वीट करुन चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू असं ट्विट उर्फीने केलं होतं. यावर चित्रा वाघ यांनी आपण हे सर्व समाजासाठी करत असल्याचं म्हटलं होतं. "मी हे समाजासाठी करत आहे. या विकृती हटल्या पाहिजेत यासाठी माझा लढा सुरु आहे. आज मुंबईत नंगानाच करतेय, उद्या बीडच्या चौकात करेल हे तुम्हाला मान्य आहे का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत हा नंगानाच चालणार नाही ही माझी भूमिका समाजस्वास्थ्याची आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं.
हा वाद सुरू असतानाच महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली. यावर देखील यांनी आपली भूमिका मांडली होती. "हे राजकारण नाही, मला नोटीस पाठवली त्याचं दु:ख नाही. मी त्याला उत्तरही पाठवलं आहे. पण समाजस्वास्थ्यासाठी काम करणाऱ्या महिलेला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. उद्या दुसरी महिला लढण्यासाठी कशी उभी राहिल? मला काहीही फरक पडत नाही, कुणी कितीही काहीही बोलू द्या. हा नंगानाच चालू देणार नाही ही माझी ठाम भूमिका आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.
दरम्यान, आज रूपाली चाकणकर यांची भेट घेतल्यानंतर उर्फी जावेदने महिला आयोगाकडे अद्याप लेखी तक्रार केलेली नाही असं सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे. मात्र, आपल्यावर झालेल्या अनन्याबाबत उर्फी जावेदने पूर्णपणे महिला आयोगाला माहिती दिली. ट्विटरच्या माध्यमांतून धमकी देणे, चित्रा वाघ यांच्याकडून धमक्या देण्यासारखे प्रकार घडत असल्याची उर्फी जावेदने महिला आयोगाचा अध्यक्षांना माहिती दिली. लवकरच आपण ऑनलाईन तक्रार करू महिला आयोगाने कारवाईचे आदेश द्यावेत अशी विनंती करणार असल्याचे उर्फीने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
उर्फी म्हणाली डीपी मेरा धासू, चित्रा मेरी सासू, आता चित्रा वाघ यांचं उत्तर