‘द केरला स्टोरी 2’ अधिक भयंकर? कडक सुरक्षेत शूटिंग पूर्ण, कधी होणार रिलीज? मोठी अपडेट समोर
कथानक पुन्हा केरळशी संबंधित असणार असून, दुसरा भाग पहिल्या चित्रपटापेक्षा अधिक भयंकर आणि धक्कादायक असेल, असा दावा केला जात आहे.

The Kerala Story 2: वादग्रस्त पण तितकीच यशस्वी ठरलेली ‘द केरला स्टोरी’ आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रचंड वाद निर्माण केला होता, मात्र बॉक्स ऑफिसवर मात्र त्याने जबरदस्त कमाई करत ब्लॉकबस्टरचा दर्जा मिळवला. आता दोन वर्षांनंतर या सिनेमाच्या सिक्वलबाबत मोठी अपडेट समोर आली असून ‘द केरला स्टोरी 2’ (The Kerala Story 2) कन्फर्म झाल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरला स्टोरी 2’वर सध्या काम सुरू असून चित्रपटाचं शूटिंगही पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, या वेळी निर्मात्यांनी संपूर्ण शूटिंग अतिशय गोपनीय आणि कडक सुरक्षेत संपवल्याचं समोर आलं आहे. कथानक पुन्हा केरळशी संबंधित असणार असून, दुसरा भाग पहिल्या चित्रपटापेक्षा अधिक भयंकर आणि धक्कादायक असेल, असा दावा केला जात आहे.
कडक सुरक्षेत पूर्ण झालं शूटिंग
सूत्रांच्या माहितीनुसार, निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी शूटिंगदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली होती. सेटवर कलाकार आणि क्रू मेंबर्सना मोबाईल फोन वापरण्याचीही परवानगी नव्हती. त्यामुळे आतापर्यंत चित्रपटातील कोणतीही माहिती किंवा फोटो लीक झालेले नाहीत. या कडक सुरक्षेमुळे ‘द केरला स्टोरी 2’बाबत सध्या अनेक गोष्टी गुप्तच ठेवण्यात आल्या आहेत.
रिलीज डेट आणि मोठी बॉक्स ऑफिस टक्कर
रिपोर्टनुसार, ‘द केरला स्टोरी 2’ 27 फेब्रुवारी 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होऊ शकतो. जर ही तारीख कायम राहिली, तर बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची थेट टक्कर राणी मुखर्जीच्या बहुचर्चित ‘मर्दानी 3’ सोबत होणार आहे. त्यामुळे 2026च्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवर मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या ‘द केरला स्टोरी 2’च्या स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, पहिल्या भागाच्या यशामुळे या सिक्वलबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहिल्या भागाला तुफान यश
सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’मध्ये अदा शर्मा प्रमुख भूमिकेत होती. बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने भारतात सुमारे 241कोटी रुपये, तर जागतिक स्तरावर 302 कोटी रुपयांची कमाई केली होती. शिवाय, या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. आता ‘द केरला स्टोरी 2’ पहिल्या भागाइतकीच खळबळ उडवणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.























