वर्षा उसगांवकरांना दिग्दर्शकानं फसवलं; घातला आर्थिक गंडा, अभिनेत्रीची पोलिसांत धाव
Marathi Actress Varsha Usgaonkar: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासह काही जणांची 47 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप.

Varsha Usgaonkar cheated in 47 lakh investment scam in Mumbai: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकरला मोठा धक्का बसला आहे. तिची आर्थिक फसवणूक झाली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मृणालिनी जांभळे यांच्यासह अनेक अभिनेत्रींची जवळपास 47 लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली, तसेच तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक आणि बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणालिनी सुभाष जांभळे या अभिनेत्रीची संशयित आरोपी अविनाश जाधव याच्याशी व्यावसायिक ओळख होती. त्यानं आपण दिग्दर्शक आणि बिल्डर असल्याचं सांगितलं. डोंबिवली येथील प्रकल्पात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देईन, असं आश्वासन त्यानं दिलं. तसेच वर्षभराच्या आत मूळ रक्कम परत देईन, असं आश्वासनही दिलं होतं.
2019 ते 2020 या काळात अभिनेत्री मृणालिनी, वर्षा ऊसगांवकर तसेच आणखी तीन जणांनी मिळून चेक आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे 47 लाखांची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक त्यांनी थेट अविनाश जाधवकडे केली. सुरुवातीला परतावा म्हणून त्याने काही रक्कम दिली. सुमारे साडेचार रुपये दिल्याची माहिती आहे. परंतु, काही काळानंतर त्यानं रिटर्न्स देणं बंद केलं. अभिनेत्रींनी त्याला थेट जाब विचारला. यावर अविनाश जाधव यानं अरेरावीची भाषा वापरण्यास सुरुवात केली.
'मी पैसे देणार नाही, जे काय तुम्हाला करायचं ते करा.. ' असं उर्मट स्वरात त्यानं पैसे परत न देण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारदारांनी केला. गुंतवणूक करुन आपली यात फसवणूक झाल्याचं समजताच अभिनेत्रीनं थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी दादर शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठलं. तसेच संशयित आरोपी अविनाश जाधवविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश शेजुळ यांच्याकडून सुरु आहे.





















