Kiran Mane: 'सिंधुताई माझी माई' मालिकेत किरण माने साकारणार 'ही' भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाले, 'त्याच्या संघर्षाचंच...'
किरण माने (Kiran Mane) यांनी एक पोस्ट शेअर करुन “सिंधुताई माझी माई" (Sindhutai Mazi Mai) या मालिकेतील त्यांच्या भूमिकेची माहिती दिली आहे.
Sindhutai Mazi Mai: अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या आयुष्यावर आधारित असणारी “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची झलक दिसत आहे. नुकतीच किरण माने यांनी एक पोस्ट शेअर करुन “सिंधुताई माझी माई या मालिकेतील त्यांच्या भूमिकेची माहिती दिली आहे.
'सिंधुताई माझी माई' या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करुन किरण माने यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आपल्या एखाद्या भुमिकेतनं, आपल्या चाहत्या प्रेक्षकांचं जगणं समृद्ध व्हावं, अशी माझी लै इच्छा होती. आता ती संधी देणारं कॅरॅक्टर मी घेऊन येतोय... सिंधूताईंसारख्या महान व्यक्तीला घडवणारा 'रियल लाईफ हिरो'...सिंधूताईंच्या आयुष्यातला 'बाप'माणूस अभिमान साठे!'
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'ज्याकाळात मुलांच्या बरोबर बसून मुलीनं शिकणं म्हणजे कमीपणाचं मानलं जायचं, पाप मानलं जायचं, त्याकाळात 'माझ्या पोरीत काहीतरी जगावेगळं आहे. तिनं शिकावं. मोठ्ठं व्हावं. तिच्या गुणांना वाव मिळाला तर ती खूप नाव कमावेल. हे या जगावेगळ्या बापानं ओळखलं होतं !संत तुकोबारायाच्या विचारांवर चालणार्या या गरीब, कष्टाळू माळकरी माणसाच्या मार्गात पहाडाएवढ्या अडचणी आल्या. संकटांचा वर्षाव झाला.पण हार मानली नाही त्यानं. "फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर... नामाचा गजर सोडू नये !" या भावनेनं विपरीत परिस्थितीशी झुंज देत राहिला. त्याच्या संघर्षाचंच पुढे जाऊन त्या मुलीनं सोनं केलं! सिंधुताईंचं आयुष्यही लै लै लै भयाण संघर्षात गेलंय. आईलाही नकोशी असलेली 'चिंधी' ते अनाथांना हवीहवीशी माय 'सिंधूताई', हा प्रवास वाटतो तेवढा साधासोपा नाहीये. मालिकाविश्वात खूप वर्षांनी खरंखुरं, तरल, भावस्पर्शी, प्रेरणादायी आयुष्य येतंय. 'सिंधुताई माझी माई', नक्की बघा.आपल्या मुलामुलींना तर आवर्जुन दाखवा.'
View this post on Instagram
"सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेत कोणती अभिनेत्री सिंधुताई यांची भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या :
Sindhutai Sapkal : 'हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या...'; माईंसाठी तेजस्विनीची भावनिक पोस्ट