Sargam Koushal Exclusive : मिसेस वर्ल्ड सरगम कौशलचं मायदेशी धुमधडाक्यात स्वागत; भारतात परतल्यानंतर एबीपी न्यूजशी साधला संवाद
Sargam Koushal : अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या केलेल्या मिसेस वर्ल्ड 2022-23 या स्पर्धेत 63 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
Sargam Koushal : भारताच्या सरगम कौशलने (Sargam Koushal) अमेरिकेत आयोजित केलेल्या मिसेस वर्ल्ड 2022-23 या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मिसेस वर्ल्ड सरगम कौशल ही अमेरिकेतील लास वेगसमधून आज भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर सरगमने तिच्या विजयाचा आनंद एबीपी न्यूजबरोबर शेअर केला आहे.
अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या केलेल्या मिसेस वर्ल्ड 2022-23 या स्पर्धेत 63 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सगळ्यांशी स्पर्धा करत 32 वर्षीय सरगमने 17 डिसेंबर रोजी लास वेगस येथे झालेल्या मिसेस वर्ल्ड 2022 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अभिमानाची गोष्ट म्हणजे सरगमने तब्बल 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. याआधी 2001 मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री अदिती गोवित्रीकर हिने मिसेस वर्ल्डचा हा किताब पटकावला होता.
सरगम कौशलने एबीपी न्यूजशी संवाद साधताना सांगितले की, या स्पर्धेत भाग घेत असताना ती खूप चिंताग्रस्त, भावूक झाली होती आणि नर्व्हस ब्रेकडाउन झाली होती. सरगम कौशलने पुढे सांगितले की, 1994 मध्ये सुष्मिता सेनला मिस युनिव्हर्सचा किताब जिंकताना पाहिल्यानंतर, आपल्या मुलीनेही अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन देशाचे नाव कमावण्याचे तिच्या वडिलांचे स्वप्न होते.
वडिलांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद
सरगमने अतिशय भावूकपणे सांगितले की, आज मला अभिमान वाटतो की, मी माझ्या वडिलांनी इतके वर्ष पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण केलं आणि त्यामुळेच विजयाचा तो क्षणही माझ्यासाठी खूप भावूक होता. सरगमने पुढे सांगितले की, वडिलांप्रमाणेच माझे पती आदित्य मनोहर शर्मा जे नौदल ऑफिसर आहेत. त्यांनीदेखील मला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खूप प्रेरित केले आणि त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला.
मिसेस वर्ल्ड स्पर्धेची विजेती सरगम कौशल ही जम्मूमध्ये लहानाची मोठी झाली. 28 वर्ष ती जम्मूमध्ये राहत होती. तिथेच तिने काही वर्ष शिक्षिका म्हणून काम केले. त्यानंतर लग्नानंतरही दोन वर्ष विशाखापट्टणममध्ये शिकवले.
सरगमने सांगितले की, लग्नानंतरही तिचे वडील तिला काहीतरी वेगळे करण्याची आणि सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करत होते आणि त्यामुळेच तिने शिकवण्याचे काम सोडले आणि मिसेस वर्ल्डची तयारी सुरू केली. या खास संवादादरम्यान सरगम कौशलने आपली मेहनत, स्पर्धा जिंकण्याची तयारी याविषयी माहिती दिली आणि आपल्या छंदांबद्दलही सांगितले. सरगमने सांगितले की, ती यापुढे मॉडेलिंग सुरू ठेवणार आहे आणि जर तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर आली तर ती त्याचाही विचार करेल.
विवाहित मुलींना दिला मोलाचा संदेश
32 वर्षीय सरगम कौशलने सर्व विवाहित मुलींना संदेश देताना सांगितले की, "जर मी स्वतः ही कामगिरी करू शकते तर देशातील कोणतीही मुलगी या मुक्कामापर्यंत पोहोचू शकते."
सरगमने मिसेस वर्ल्ड (2001) ची विजेती अदिती गोवित्रीकरबरोबर देखील चर्चा केली. त्यांनी देखील स्पर्धेत जाण्यापूर्वी तिला खूप पाठिंबा दिला होता.
यावेळी मुलाखतीला उपस्थित असलेल्या मोहिनी शर्मा (नॅशनल डायरेक्टर ऑफ मिसेस वर्ल्ड, इंडिया) यांनी सांगितले की, 2016 मध्ये त्या स्वत: या विजेतेपदाला मुकल्या होत्या आणि तेव्हापासूनच त्यांनी निर्धार केला होता की त्या भारतीय महिलांना जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :