रश्मिका-विजयच्या रिसेप्शनला अनवाणीच पोहोचला हा अभिनेता, डोक्यापासून पायापर्यंत काळा पोशाख, कारण ऐकून हैराण व्हाल
4 मार्च रोजी हैदराबादमध्ये या दोघांनी भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या समारंभाला चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Rashmika Vijay Reception: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या सतत चर्चेत आहेत ते त्यांच्या लग्नामुळे. उदयपूरमध्ये अवघ्या 100 नातेवाईकांच्या उपस्थितीत साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. दोघांचा विवाहसोहळा अगदी शाही पद्धतीने पार पडला. 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये दोघांनी लग्न केले. 4 मार्च रोजी हैदराबादमध्ये या दोघांनी भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या समारंभाला चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते राम चरण यांच्या वेगळ्या अंदाजाने.
रामचरण अनवाणीच पोहोचले रिसेप्शनला
रामचरण आपल्या पत्नी उपासना कामिनेनी कोनिदेलासोबत या रिसेप्शनला पोहोचले होते. त्यांनी डोक्यापासून पायापर्यंत काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. पण सर्वांचं लक्ष वेधलं ते त्यांच्या पायांकडे. कारण ते या कार्यक्रमाला चप्पल-बूट न घालता, अनवाणीच आले होते. त्यांना अशा अवस्थेत पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावरही त्यांच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू झाली.
अनवाणी येण्यामागचं कारण काय?
रामचरण सध्या ‘अयप्पा दीक्षा’ पाळत आहेत. हे व्रत अयप्पा स्वामींच्या भक्तांकडून पाळलं जाणारं अत्यंत कठीण आणि पवित्र व्रत मानलं जातं. या काळात भक्तांना काही कठोर नियमांचं पालन करावं लागतं.या व्रतात काळे किंवा निळे कपडे परिधान करणे, साधं जीवन जगणे आणि तब्बल 41 दिवस अनवाणी राहणे आवश्यक असतं. त्यामुळेच रामचरण रिसेप्शनमध्येही बूट-चप्पल न घालता दिसले.
View this post on Instagram
41 दिवसांचं कठोर व्रत
‘अयप्पा दीक्षा’ दरम्यान भक्तांना पूर्ण ब्रह्मचर्य पाळावं लागतं. यासोबतच मांसाहार आणि मद्यपान टाळणं, तसेच केस किंवा दाढी न कापणं हे नियमही पाळावे लागतात. हे व्रत प्रामुख्याने शबरीमाला मंदिर येथे यात्रेला जाण्यापूर्वी केलं जातं.विशेष म्हणजे रामचरण याआधीही अशाच अंदाजात दिसले होते. 2023 मध्ये ऑस्कर सोहळ्यापूर्वीही ते अयप्पा दीक्षा पाळताना अनवाणीच दिसले होते. त्यामुळे रश्मिका-विजयच्या रिसेप्शनमधील त्यांचा हा साधा पण वेगळा अंदाज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.





















