(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वेबसीरिजसाठीची 250 कोटींची ऑफर सलमानने नाकारली, प्रभूदेवाचा गौप्यस्फोट
वेबसीरिजसाठीची 250 कोटींची ऑफर सलमानने नाकारली असल्याचा गौप्यस्फोट अभिनेता, दिग्दर्शक प्रभूदेवानं केला आहे.ओटीटीपेक्षा सलमानला थिएटर प्रिय असल्याचं यावरुन स्पष्ट झालं आहे.
मुंबई : लॉकडाऊनमध्ये थिएटर्स बंद झाल्यानंतर प्रत्येकाला ओटीटी व्यासपीठ जवळचं वाटू लागलं. म्हणून अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे ओटीटीवर आले. अगदी अमिताभ बच्चन, आयुशमान खुराना, अक्षयकुमार, विद्या बालन, अभिषेक बच्चन, कुणाल खेमू आदी अनेक कलाकारांचा यात समावेश होतो. पण याला अपवाद ठरली ती दोन माणसं. ज्यांनी आधीपासून आपण आलो तर थिएटरमध्येच येऊ असं सांगितलं होतं. एक होता रोहित शेट्टी आणि दुसरा होता सलमान खान. पण आता सलमानबद्दल एक नवी बातमी समोर येते आहे. ही बातमी दिली आहे त्याच्या मित्राने... त्याचा मित्र प्रभूदेवा.
सलमानला ओटीटीबद्दल कधीच आकर्षण नव्हतं. तो नेहमी थिएटरमध्येच आपले सिनेमे बघतो. म्हणजे आपले सिनेमे थिएटरवर कसे लागतील हेच पाहातो. म्हणून त्याने राधे हा चित्रपट थिएटरमध्येच रिलीज करण्याचा चंग बांधला होता. ओटीटीचा विचारही सलमानच्या मनात आला नाही असं प्रभूदेवाचं म्हणणं. याबद्दल बोलताना प्रभूदेवा म्हणाला, 'मी सलमानला ओळखतो. त्याला त्याचा राधे हा चित्रपट थिएटरमध्येच रिलीज करायचा होता. त्याने तसं आधीच सांगून ठेवलं होतं. अनेक मोठ्या ओटीटी बॅनर्सनी सलमानला मोठ्या ऑफर्स दिल्या होत्या. राधे चित्रपट आपल्याकडे यावा म्हणून अनेकांनी सलमानकडे विचारणा केली होती. पण सलमान आपल्या विचारांवर ठाम होता. म्हणून राधे आताही थिएटरमध्ये येईल.'
प्रभूदेवाने सलमानबद्दल आणखी एक गोष्ट सर्वांना सांगितली. तो म्हणाला, सलमानने राधे हा चित्रपट थिएटरमध्ये आणायचं ठरवल्यानंतर सलमानकडे आणखी एक विचारणा झाली. ती अशी की सलमानने डिजिटल कंटेंटमध्ये काम करण्याचा आग्रह धरण्यात आला. यावेळी सलमानला वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी आलेली ऑफर होती तब्बल 250 कोटी रुपयांची. पण सलमानने तीही नाकारली. कारण ओटीटी कंटेंटपेक्षा त्याला आपला चित्रपट थिएटरमध्ये लागणं महत्वाचं वाटतं.'
खरंतर लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन माध्यमाचा सलमान इतका प्रभावी वापर दुसऱ्या कोणाही सेलिब्रेटींनी केला नाही. या काळात त्याने स्वत:चं यू ट्यूब चॅनल काढलं. त्यानंतर त्याने त्यावर आपलं गाणंही आणलं. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. पुझे त्याने सॅनिटायझर आणि मास्कही आणले. लॉकडाऊनचा वापर करत त्याने आपल्या यू ट्यूब चॅनलवरून अनेक गाणी आणली. अनेक मेसेज दिले. असं असताना सिनेमा किंवा वेबसीरीज करायला मात्र त्याने नकार दिला आहे. या नकाराची कळलेली किंमत आहे ती अडीचशे कोटी रुपये.