Kolhapur Nandani Mahadevi Elephant: 'वनतारा'ला नांदणीची महादेवी हत्तीणच का हवी होती? किरण मानेंनी सांगितलं मोठं कारण
Kiran Mane on Kolhapur Mahadevi: महादेवी हत्तीणीला निरोप देताना नांदणीकरांना अश्रू अनावर झाले होते. या हत्तीणीची मिरवणूक काढून तिला 'वनतारा'ला पाठवण्यात आले होते.

Kiran Mane on Kolhapur Mahadevi: कोल्हापूरच्या नांदणी येथील मठातील महादेवी हत्तीणीला काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील वनतारा या प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले होते. या निर्णयाला प्रचंड विरोध झाला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदणीकरांना नाईलाजाने आणि काळजावर दगड ठेवून लाडकी महादेवी (Mahadevi) हत्तीण 'वनतारा'ला पाठवावी लागली होती. मात्र, यानंतर आता नांदणीसह कोल्हापूरमध्ये (Kolhapur) संतप्त पडसाद उमटत आहेत. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी जनचळवळ उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. 'वनतारा'ने पेटा (PETA) या संस्थेला हाताशी धरुन महादेवी हत्तीणीला गुजरातला नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचा आरोप किरण माने यांनी केला आहे. (Vantara news)
Kiran Mane: किरण माने यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
…एका मुक्या जीवाच्या भावनेशी लै जीवघेणा खेळ खेळला गेलाय. ‘वनतारा’ वाल्यांना एक प्रशिक्षित हत्ती हवा होता. संपूर्ण भारतात शोध घेतल्यावर त्यासाठी त्यांना दोन हत्तीणी पसंत पडल्या. त्यातली एक केरळची होती. केरळवाल्यांनी ती द्यायला साफ नकार दिला. मग हे ‘व्यापारी’ नांदणीत आले. तिथल्या महादेवी उर्फ माधुरीसाठी त्यांनी ‘सौदा’ करायचा प्रयत्न केला. “आम्हाला ही प्रशिक्षित हत्तीण हवी आहे” म्हणत पैशांचं आमिषही दाखवलं. पण अख्ख्या नांदणीचा जीव असलेली माधुरी ते कशी विकतील?
…मग या स्टोरीत ‘ड्रामा’ आला. ‘पेटा’ नांवाच्या कॅरॅक्टरची एंट्री झाली. पेटाचे डॉक्टर्स अचानक माधुरीला तपासायला आले आणि त्यांनी सांगितलं की ‘माधुरीच्या पायाला इजा आहे. इथे तिच्या तब्येतीची हेळसांड केली जाते. तिचा जीव धोक्यात आहे.’ मग नांदणीवाल्यांनी त्यांचा डॉक्टर आणला. त्या डॉक्टरांनी सांगितलं माधुरी एकदम ठणठणीत आहे. पेटावाले सांगताहेत तसं काहीही नाहीये. पण पैशापुढं सरकारपासून न्यायव्यवस्थेपर्यंत सगळे झुकले.
…महादेवी उर्फ माधुरीला नांदणी सोडून जावं लागलं. नांदणीवर तिचा आणि तिच्यावर नांदणीचा लै जीव होता. इथल्या प्रत्येक घरावर तिची मायेची सावली होती. माहेरी आलेली पोर पहिल्यांदा महादेवीला भेटायची, मग आईबापाला. गांव सोडताना या मुक्या प्राण्याची वेदना डोळ्यांतून घळाघळा वहात होती, ते पाहून काळीज पिळवटलं !
यापूर्वी अशाच पद्धतीनं दोन वर्षांपूर्वी ताडोबा अभयारण्यातनं तब्बल 13 हत्ती महाराष्ट्र सरकारनं रिलायन्सला दिलेले आहेत. कारणं तीच : हत्तींची काळजी घ्यायला कुशल स्टाफ नाही.’ तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या भावाबहिणींनो, आजवर गुजरातमध्ये एकही हत्ती नव्हता. पण येत्या काही काळात तुम्हाला हत्ती पाहायचा असेल तर गुजरातला जावं लागेल. कारण या लोकांचा देशातल्या अनेक हत्तींवर डोळा आहे… आणि हाताशी ‘पेटा’ नावाचा हुकमी पत्ता आहे !
बाय द वे, आता महादेवीनंतर तीन मठांच्या हत्तींवर संक्रांत आहे. कर्नाटकातल्या शेडबाळ, अकलनूर आणि बिचले इथल्या मठांना त्यांच्या हत्तींच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याची नोटीस गेली आहे… असो.
धुआँ जो कुछ घरों से उठ रहा है…
न पूरे शहर पर छाए, तो कहना !
- किरण माने.
View this post on Instagram
आणखी वाचा























