करन जोहर आणि कार्तिक आर्यनचा 'दोस्ताना' तुटला! कार्तिकला सिनेमातून काढलं, कधीच काम न देण्याचा निर्णय!
करन जोहरनं कार्तिक आर्यनला 'दोस्ताना 2' मधून बाहेर काढलं आहे. तसंच भविष्यात कार्तिक आर्यनसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : 'प्यार का पंचनामा' चित्रपटातून प्रसिद्ध झालेला अभिनेता कार्तिक आर्यन बऱ्याच संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख मिळवली आहे. मोठ्या निर्माते आणि दिग्दर्शकांकडून त्याला चित्रपट देखील मिळू लागले आहेत. कार्तिक आर्यनचं स्वप्न होतं की, कधीतरी करन जोहरच्या धर्मा प्रोडक्शनसोबत काम करायचं. तशी संधी देखील त्याला मिळाली. करन जोहरच्या 'दोस्ताना 2' मध्ये त्याला संधी मिळाली देखील मात्र सिनेमा यायच्या आधीच कार्तिक आर्यनचा करन जोहर आणि धर्मा प्रोडक्शनशी दोस्ताना तुटला.
धर्मा प्रोडक्शनशी संबंधित एका व्यक्तिनं एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, करन जोहरनं कार्तिक आर्यनला 'दोस्ताना 2' मधून बाहेर काढलं आहे. तसंच भविष्यात कार्तिक आर्यनसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
'दोस्ताना 2'मध्ये लीड रोल मिळालेल्या कार्तिक आर्यनला सिनेमातून का काढलं? याबाबत विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं की, 'कार्तिक आर्यनची अनप्रोफेशनल वागणूक आणि सिनेमाच्या स्क्रिप्टवरुन झालेले मतभेद याला कारणीभूत आहेत.
सूत्रांनी सांगितलं की, "कार्तिक आर्यनला दीड वर्षांनंतर 'दोस्ताना 2' च्या स्क्रिप्टमध्ये कमी दिसून आली. त्यात बदल करावे अशी त्याची इच्छा होती. कार्तिकच्या अशा वागणुकीमुळं धर्मा प्रोडक्शनने त्याच्यासोबत यापुढे कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर आणि लक्ष्य लालवानी स्टारर 'दोस्ताना 2' ची आतापर्यंत 20 दिवसांची शूटिंग देखील झाली आहे. मागील वर्षी कोरोना महामारीमुळं या सिनेमाची शूटिंग झाली नाही. 2019 मध्ये या चित्रपटामधील काही सीनचं शुटिंग झालेलं आहे. लवकरच या सिनेमाची शुटिंग सुरु होणार होती. मात्र त्याआधीच कार्तिक आर्यनला हा चित्रपट सोडावा लागला आहे. आता या सिनेमात मुख्य भूमिकेत कोण दिसणार? याबाबत उत्सुकता आहे. लवकरच याची घोषणा होईल असं सूत्रांकडून कळलं आहे.