आरएसएस आणि तालिबान संदर्भातील वक्तव्य जावेद अख्तर यांना भोवण्याची चिन्ह
आरएसएस आणि तालिबान संदर्भातील वक्तव्य जावेद अख्तर यांना भोवण्याची चिन्ह दिसत आहे. कारण, मुंबई मुख्य दंडाधिकारी कोर्टात त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करत याचिका दाखल करण्यात आलीय.
मुंबई : तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संदर्भ जोडत कथित वादग्रस्त विधान करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध कवी, पटकथा लेखक, गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात एका वकिलाने मानहानीचा दावा दाखल केला आहे. यामुळे अख्तर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालिबानमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर जगभर त्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशातच अख्तर यांनी एका वृत्तवाहीनीला यासंदर्भात मत व्यक्त करताना आरएसएसचा उल्लेख केला होता. ज्यात त्यांनी तालिबानी आणि आरएसएस एकसमान असल्याच्या आशयाची कथित तुलना केली होती. यामुळे त्यांच्या विरोधात अॅड. ध्रुतीमन जोशी यांनी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
जावेद अख्तर यांनी तालिबानची तुलना आरएसएसबरोबर केली आहे. संघाची विचारसरणी तालिबानी सारखी आहे, आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण करते, असंही अख्तर यांनी म्हटल्याचा दावा करण्यात आहे. यामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा आरोप जोशी यांनी याचिकेतून केला आहे. याबाबत त्यांनी आता न्यायालयात दावा दाखल केला. लवकरच यावर मुंबई मुख्य दंडाधिकारी कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विधानांवरुन जावेद अख्तर यांना अन्य एक वकिल संतोष दुबे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. ज्यात हे विधान मागे घेण्याची मागणी केलेली आहे. यामुळे अख्तर यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जावेद अख्तर यांचे मुलाखतीदरम्यान वक्तव्य
एका मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, की "जे संघाचे समर्थन करतात त्यांची मानसिकताही तालिबानसारखीच आहे. जे संघाचे समर्थन करतात त्यांनी आत्मपरीक्षण करावे." ते पुढे म्हणाले, "तालिबान आणि तुम्ही ज्यांना पाठिंबा देत आहात त्यांच्यात काय फरक आहे? त्यांची जमीन मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहेत. दोघांची मानसिकता समान आहे." त्यांच्या वक्तव्याला जोरदार विरोध होत आहे.