The Kerala Story : महाराष्ट्रातील नेत्यांनी 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आयोजित केल्याने केदार शिंदे संतापले; ट्वीट करत म्हणाले,"या नेत्यांना..."
The Kerala Story : महाराष्ट्रातील नेत्यांनी 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आयोजित केल्याने दिग्दर्शक केदार शिंदे संतापले आहेत.
Kedar Shinde On The Kerala Story : केदार शिंदेंचा (Kedar Shinde) 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. आता महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? असा सवाल करत दिग्दर्शक केदार शिंदेंनी ट्विट केलं आहे.
'द केरळा स्टोरी' अन् 'महाराष्ट्र शाहीर' आमने-सामने
'द केरळा स्टोरी' आणि 'महाराष्ट्र शाहीर' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आले आहेत. 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाचं, कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. तर 'द केरळा स्टोरी' या सिनेमाला एकीकडे विरोध होत आहे. रिलीजआधीपासूनच या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. तर दुसरीकडे या सिनेमाच्या कथानकाने प्रेक्षक भारावले आहेत. अनेक ठिकाणी या सिनेमाचे मोफत शो आयोजित केले जात आहेत.
महाराष्ट्रातील नेते 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचे खास शो आयोजित करत आहेत. त्यामुळे 'महाराष्ट्र शाहीर'चे दिग्दर्शक केदार शिंदे संतापले आहेत. ट्वीट करत ते म्हणाले,"दुर्दैव... महाराष्ट्रात 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करुन लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?".
दुर्दैव... महाराष्ट्रात "केरला स्टोरी" या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शाहीर" प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का? pic.twitter.com/s4cup46lns
— Kedar Shinde 🇮🇳 (@mekedarshinde) May 7, 2023
केदार शिंदे यांच्या ट्वीटनंतर 'महाराष्ट्र शाहीर' विरुद्ध 'द केरळ स्टोरी' असा वाद पेटण्याची शक्यता आहे. केदार शिंदे यांच्या ट्वीटवर 'खरचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राला आज हे दिवस बघायला लागत आहेत, या दोन्ही सिनेमांची तुलना होऊच शकत नाही, स्वतःच्या आजोबांच्या चित्रपटासाठी तुम्ही आग्रही असणं समजू शकतो. पण म्हणून ज्वलंत आणि महत्त्वाच्या 'द केरळ स्टोरी'ला विरोध करणं हा स्वार्थीपणा आहे, अशा संमिश्र ट्वीट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
'द केरळा स्टोरी'चा बॉक्स ऑफिसवर धमाका
'द केरळा स्टोरी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 8.3 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 11.22 कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी 16.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 35.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील होणार आहे.
संबंधित बातम्या