एक्स्प्लोर
Movie Review | कसा आहे 'दे दे प्यार दे' सिनेमा?
या सिनेमातील बलस्थान आहे ते याचं कास्टिंग. अजय देवगण आणि तबू यांना पडद्यावर पाहायला मजा येते. पण सरप्राईज पॅकेज आहे ते राकुल प्रीत सिंग.

लव रंजन आणि अकिव अली यांच्या या सिनेमात काय नाहीये? सगळं आहे. अगदी सगळं. म्हणजे, यात तुम्हाला हवी तशी हॉट मुलगी आहे. अत्यंत तंग कपडे घालून ती वावरली आहे. तिला सोबत केली आहे ती अजय देवगणसारख्या कडक नजरेच्या नायकाने. शिवाय 'चेरी ऑन द केक' म्हणून तब्बू आहे. काय हवं आणखी? या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर सिनेमात धमाका असेल याची खात्री पटते. वयाच्या पन्नाशीत पोचलेल्या पत्नीपासून विभक्त झालेल्या नायकाला आपल्या वयाच्या निम्म्या वयाची मुलगी आवडते. तिलाही तो आवडतो आणि मग सुरू होतं त्यांचं गरमागरम अफेअर. खरंतर पंचेचाळीशी पार असलेल्या कुणाही पुरूषाला ही दंतकथा वाटावी. पण सिनेमा तेवढाच नाहीय. कारण तो लिहिला आहे लव रंजनने. सिनेमा यापुढे खूप काही आहे आणि खूप महत्वाचा आहे.
पन्नाशीच्या पुरूषाला पंचविशीतल्या मुलीशी प्रेम व्हावं.. यातला मोठा अडसर कोणता? जनरेशन गॅप. याच जनरेशन गॅपला समोर ठेवून संपूर्ण सिनेमा तयार करण्यात आला आहे. म्हणजे फक्त या दोघांमधली गॅप तर नायकाच्या मुलांपासून सगळ्या व्यक्तिरेखांभवती ही गॅप फिरते. यातूनच हा सिनेमा अत्यंत हलक्याफुलक्या पद्धतीने गमतीदार स्टेटमेंट करतो पण आजच्या पिढीची मोकळीढाकळी मानसिकता अधोरेखित करतो. काही बंडखोर विधानंही करतो.
काही वर्षांपूर्वी आलेल्या स्वदेसमध्ये मोहन भार्गव गावातल्या लोकांसमोर सांगतो, की मै नही मानता की हमारा देश सबसे अच्छा देश हे. लेकीन उसमे वह बननेकी क्षमता जरूर है. हे त्यावेळचं धाडस होतं. हा संवाद आठवण्यामागचं कारण असं की या सिनेमातही असे अत्यंत महत्वाचे संवाद पाहायला मिळतात. अगदीच उदाहरण द्यायचं तर, लग्न पाहायला आलेल्या वराच्या नातेवाईकांसमोर नायक अजय देवगणची मुलगी म्हणते, की आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. पण लग्न करण्याआधी आम्हाला एकमेकासोबत राहून पाहायचं आहे. तिचा बापही तिच्या या इच्छेला पाठिंबा देतो. हा खूप महत्वाचा प्रसंग यात आहे. नवऱ्याविना संसार हाकणारी नायकाची बायको एका अनामिक क्षणी आपण कसे आता दमलो आहोत हे सांगते तेव्हाही सिंगल पॅरेंट असताना अंगावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांना इथे अधोरखित केलं जातं. बरं.. असे संवाद असूनही सिनेमा कुठेच बोजड होत नााही. यातली कोणतीही गोष्ट ट्रेलरमध्ये नाही. पण उत्तरार्धात ही कौटुंबिक कहाणी बदलत्या पिढीचे अनेक पदर उलगडून सांगते.
आशीष हा लंडममध्ये एका कंपनीचा मालक आहे. तो श्रीमंत आहे. पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे तो एकटाच राहतो. त्याच्या आयुष्यात त्याच्या मुलीच्या वयाची आयेशा येते. आयेशाही लंडनमध्ये काम करून पैसे कमावते. शिक्षण घेते. दोघांचंही पहिल्या भेटीत नाही. पण हळूहळू मैत्री होते. प्रेम जमतं. दोघे लग्नाचा निर्णय घेतात. हा निर्णय भारतात असलेल्या आपल्या पत्नीला सांगायचा निर्णय आशीष घेतो. मग पुढे काय होतं.. तो भारतात येतो का.. त्याला लग्नाला परवानगी मिळते का.. अशा बाजूंना स्पर्श करत सिनेमा पुढे जातो.
अकिव अली यांचं हे पहिलं दिग्दर्शन. संकलन करता करता आता ते दिग्दर्शनात उतरले आहेत. याचा मोठा फायदा त्यांना झाला आहे. आणि सिनेमाचं मोठं बलस्थान आहे ते या सिनेमाचं लेखन. पटकथा, संवाद. एक बार सोनेसे अगर प्यार नही हो जाता. तो एक बार सो जाने से प्यार खत्म कैसे हो जाता है.. यांसारखे संवाद.. किंवा मै दोबारा जी लुंगा.. सारखे संवाद मजा आणतात. शिवाय यात मसालेदार गाणीही आहेत. यात अगदी पार्टी सॉंग पासून प्रेम, विरह आदी अनेक गाणी आहेत. ती श्रवणीय आहेत.
यातलं मोठं बलस्थान आहे ते याचं कास्टिंग. अजय देवगण आणि तबू यांना पडद्यावर पाहायला मजा येते. पण सरप्राईज पॅकेज आहे ते राकुल प्रीत सिंग. ती हॉट तर आहेच. पण अजय आणि तब्बू यांच्या समोर ती आत्मविश्वासाने उभी राहते. आजच्या जनरेशनची वाटते. शिवाय आलोकनाथ, जावेद जाफरी, जिमी शेरगील यांचा अभिनयही चोख. या सिनेमातली कॉमेडी फक्त आपण यापूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. पण त्यात दिग्दर्शक-लेखकाने जे सांगू पाहिलं आहे ते जास्त महत्वाचं आहे.
हा सिनेमा म्हणजे मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज आहे. नाही म्हणायला यात मद्यपानाचे प्रसंग जरा जास्त आहेत. शिवाय राकुलचं सौंदर्य सर्व कोनातून टिपण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. त्यामुळे १६ वर्षाखालील मुलांना न नेल्यास उत्तम. आदरवाईज.. सिनेमा धमाकेदार आणि पैसे वसूल आहे. पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत तीन स्टार्स.
यातल्या संगीताची, कलादिग्दर्शनाची जादू पाहायची असेल तर सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायाल हवा. या सिनेमाद्वारे ते 'प्यार दे दे..' म्हणतायत तर आपण ते प्यार घ्यायला काहीच हरकत नाही. मजा येईल हे नक्की.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
Advertisement
























