बॉलिवूडच्या प्रवासाचा साक्षीदार आर के स्टुडिओ इतिहासजमा होणार
अभिनेते राज कपूर यांनी 70 वर्षांपूर्वी बनवलेला आर. के. स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांना घेतला आहे.
मुंबई : अभिनेते राज कपूर यांनी 70 वर्षांपूर्वी बनवलेल्या आर. के. स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांना घेतला आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या प्रवासातील महत्त्वाचा साक्षीदार असलेला आर. के. स्टुडिओ आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.
स्टुडिओच्या मेंटेनन्सचा खर्च हा अधिक असून यातून मिळणारं उत्पन्न मात्र कमी असल्यामुळे हा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतल्याचे कळत आहे. कपूर कुटुंबियांनी स्टुडिओच्या विक्रीबाबत बिल्डर, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट्ससोबत बोलणी देखील सुरू केली आहे.
ऋषी कपूर यांनी या बातमीला दुजोरा दिल्याची माहित सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आर के स्टुडिओला भीषण आग लागली होती. या भीषण आगीत स्टुडिओचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे स्टुडिओ पुन्हा उभा करणे मोठं खर्चिक आणि अशक्य असल्याने तो विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबियानी घेतला असल्याचं समोर येत आहे.
राज कपूर यांनी आपल्या अनेक सिनेमांची निर्मिती आर के स्टुडिओमध्ये केली होती. आग, बरसात, आवारा, श्री 420, संगम, मेरा नाम जोकर, बॉबी, आणि राम तेरी गंगा मैली यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांचं शुटिंग या आर के स्टुडिओमध्ये झालं होती.