(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid care centre | अमिताभ बच्चन यांच्या मदतीने मुंबईत कोविड केअर सेंटर सुरू
अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या जुहू भागात असलेल्या रितंबरा विश्व विद्यापीठ नावाच्या शाळा आणि महाविद्यालयात 25 बेडचे कोविड सेंटर तयार करण्यास मदत केली आहे.
मुंबई: अमिताभ बच्चन यांची कोरोना रुग्णांना सातत्याने मदत सुरु आहे. अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी दिल्लीच्या रकबगंज गुरुद्वारा येथे सुरू केलेल्या 400 खाटांच्या कोविड केअर सेंटरसाठी 2 कोटी रुपयांची देणगी दिली. हे कोविड केअर सेंटर गेल्या आठवड्यात सुरू झाले. आता मुंबईतही कोविड सेंटर सुरू करण्यासाठी अमिताभ यांनी योगदान दिले आहे.
अमिताभ यांनी मुंबईच्या जुहू भागात असलेल्या रितंबरा विश्व विद्यापीठ नावाच्या शाळा आणि महाविद्यालयात 25 बेडचे कोविड सेंटर तयार करण्यास मदत केली आहे. यासाठी, अमिताभ यांनी आवश्यक वैद्यकीय उपकरणांपासून ते स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी आर्थिक सहाय्य केले आहे.
पूर्णपणे तयार झालेल्या या सेंटरचा बुधवारी प्रारंभ होणार आहे, हे कोविड सेंटर दोन प्रभागांमध्ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये बुधवारी सकाळपासून कोरोना रूग्णांची भरती सुरू केली जाईल. सध्या या दोन्ही प्रभागात 25 रूग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे, परंतु आवश्यक असल्यास 30 रुग्णांना येथे दाखल करता येईल.
या कोविड सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे येथे रूग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, त्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्स आणि कंसंट्रेटरचीही संपूर्ण व्यवस्था केली गेली आहे. येथे दाखल झालेल्या रूग्णांना विनामूल्य पौष्टिक आहार देण्यात येणार आहे, त्यांच्यासाठी मोफत फिजिओथेरपी व मानसिक आरोग्याचे समुपदेशन देखील करण्यात येणार आहे.
रितंबरा विश्व विद्यापीठात स्थापित हे कोविड केअर सेंटर मालिनी किशोर संघवी महाविद्यालयाच्या आवारात आहे. एबीपी न्यूजशी बोलताना त्याचे विश्वस्त उमेश संघवी म्हणाले की, "येथे येणाऱ्या रुग्णांसाठी बहुतांश सुविधा मोफत असतील आणि त्यांना येथे काही अडचण येऊ नये याची काळजी घेतली जाईल. आम्ही अमिताभ बच्चन यांनी हे कोविड सेंटर सुरू करण्यास मदत केल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत."
विशेष म्हणजे या कोविड केअरच्या स्थापनेत सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता आनंद पंडित यांचेही योगदान आहे. आनंद पंडित केवळ अमिताभ बच्चन यांचे चांगले मित्र नाहीत तर अमिताभ यांनी आनंद पंडितच्या 'चेहरे' चित्रपटामध्ये मुख्य भूमिका देखील साकारली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे 'चेहरे' रिलीज तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे.