Bigg Boss 19 Finale:18 पैकी फक्त पाच उरले शर्यतीत! 4 महिन्यांची प्रतीक्षा संपणार,बिग बॉसची ट्रॉफी कोणाकडे जाणार?
चार महिन्यांच्या या प्रवासाचा शेवट कोणासाठी विजय घेऊन येतो, हे पाहण्यासाठी सगळ्यांची नजर स्क्रीनवर खिळणार आहे.

Bigg Boss 9 Finale: बिग बॉस 19 चा महामुकाबला शेवटी आलाच. ऑगस्टमध्ये सुरुवात झालेला हा सीझन आज म्हणजे 7 डिसेंबरला ग्रँड फिनालेसह (Bigg Boss Grand Finale) संपणार आहे. जवळपास चार महिने प्रेक्षकांना खिळवून ठेवलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये सुरुवातीला 18 स्पर्धक होते, सोबतच काही वाइल्ड कार्ड एंट्रीजनीही घरात रंगत आणली. आता फक्त पाच दावेदार उरले आहेत आणि आज रात्री 9 वाजता JioHotstar व Colors TV वर या लढतीचा निकाल लागणार आहे.
Bigg Boss 19 Finale: हे पाच स्पर्धक भिडणार आमनेसामने
या सीझनमध्ये ज्या पाच जणांनी शेवटपर्यंत दमदार खेळ दाखवत फिनालेपर्यंत मजल मारली, त्यात गौरव खन्ना, फरहाना भट्ट, तान्या मित्तल, अमाल मलिक आणि प्रणीत मोरे यांचा समावेश आहे. प्रत्येकाची स्वतःची शैली, स्वतःचा खेळ आणि स्वतःचा फॅनबेस असल्यामुळे आजची लढत अतिशय मनोरंजक होणार आहे.
गौरव खन्ना: शांत स्वभाव, दमदार खेळ
फिनालेच्या रेसमध्ये सर्वात आघाडीवर नाव घेतलं जातं ते गौरव खन्नाचं. ‘अनुपमा’ मालिकेत ‘अनुज कपाडिया’ म्हणून घराघरात पोहोचलेला गौरव बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच स्थिर, शांत आणि संयमी खेळासाठी ओळखला गेला. मार्चमध्ये त्याने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ही जिंकून आपली पकड आणखीन घट्ट केली होती. त्याची सकारात्मक आणि प्रामाणिक वर्तणूक प्रेक्षकांच्या मनात भरली.
फरहाना भट्ट : निडर, सरळ आणि बेधडक आवाज
सीजनच्या पहिल्या दिवशीच घरच्यांनी तिला बाहेर काढलं, पण त्या सीक्रेट रूममध्ये गेल्यानं त्यांचा गेम पलटला. नव्या उत्साहाने आणि अधिक आत्मविश्वासाने ती पुन्हा घरात आली. अभिनेत्री, सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि पीस अॅक्टिविस्ट असलेल्या फरहानाने संपूर्ण सीजनमध्ये बेधडकपणे मते मांडली.
तान्या मित्तल : चर्चेचा केंद्रबिंदु
या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारी स्पर्धक म्हणजे तान्या मित्तल. सोशल मीडियावर सुरुवातीपासूनच व्हायरल, कधी विचित्र दावे, कधी लक्झरीचे किस्से… “बकलावा खायची इच्छा झाली की मी थेट दुबईला जाते” यांसारख्या विधानांमुळे तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. तरीही तिचा गेमप्लॅन, उपस्थिती आणि बिनधास्तपणा तिला चर्चेत ठेवत राहिला.
अमाल मलिक : अनेक चढ -उतार, पण स्थिर खेळ
अरमान मलिकचा भाऊ, सिंगर-सॉन्गराइटर अमाल मलिक याचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यानी घरात अनेक गोष्टी खुल्या केल्या, त्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सलमान खानकडून फीडबॅक घेतल्यानंतर त्यानी वाद, नकारात्मकता यापासून दूर राहून शांत गेमप्ले स्वीकारला.त्याच्या प्रामाणिक वळणामुळे तोही फिनालेचा मजबूत दावेदार बनला.
प्रणीत मोरे : अंडरडॉग ते सॉलिड परफॉर्मर
स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेला अनेकांनी अंडरडॉग म्हटलं, पण त्यांच्या रोस्ट परफॉर्मन्स, विनोद आणि स्पष्ट बोलण्यामुळे त्याने घरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. डेंगूमुळे काही दिवस घराबाहेर जावं लागलं, परंतु पुनरागमनानंतर त्याच्या फॅन्सनी सोशल मीडियावर त्याला जोरदार पाठिंबा दिला.आज रात्री फिनालेचा पडदा उघडेल आणि ट्रॉफी कोणाच्या हातात जाणार याची मोठी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.चार महिन्यांच्या या प्रवासाचा शेवट कोणासाठी विजय घेऊन येतो, हे पाहण्यासाठी सगळ्यांची नजर स्क्रीनवर खिळणार आहे.
बिग बॉस ट्रॉफी जिंकल्यावर बक्षीस काय?
‘बिग बॉस’च्या फॅन्समध्ये विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळणार याविषयी नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. सुरुवातीच्या काही सीझन्समध्ये ही प्राईज मनी तब्बल 1 कोटी रुपये होती. मात्र, नंतरच्या सीझन्समध्ये यात कपात करण्यात आली. गेल्या म्हणजेच सीझन 18 मध्ये ज्या प्रमाणे बक्षीस रक्कम देण्यात आली होती, त्याच धर्तीवर या वर्षीही विजेत्याला 50 लाख रुपये आणि ट्रॉफी देण्यात येणार असल्याचा अंदाज आहे.























