1770 Motion Poster : 'आनंदमठ'वर आधारित ‘1770’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपट सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार!
1770 Motion Poster : हा चित्रपट एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
1770 Motion Poster : भारताचा गौरवशाली 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना, निर्माते शैलेंद्र केकुमार, सुजय कुट्टी, कृष्ण कुमार बी आणि सूरज शर्मा यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित बहुचर्चित भव्यदिव्य अशा ‘1770’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘एस एस 1’ एन्टरटेनमेन्ट आणि पी के एंटरटेनमेंट या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असून, या बहुभाषिक असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक अश्विन गंगाराजू हे करणार आहेत. त्यांनी याआधी राजामौली यांना 'एग्गा' आणि 'बाहुबली' या दोन्ही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
विषय माझ्यासाठी आव्हानात्मक!
अश्विन गंगाराजू म्हणतात की, हा विषय माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता. पण, दिग्गज व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी रूपांतरित कथा आणि पटकथा लिहिल्याने मला निश्चित वाटते आहे की, आमच्याकडे ज्या पद्धतीने हे लेखन झाले आहे, तो एक ब्लॉकबस्टर सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ते पुढे म्हणाले की, ज्या कथांमध्ये विशिष्ट कालखंड दाखवणारी पार्श्वभूमी असेल, भावनांना जिथे जास्त महत्व असेल आणि जिथे लार्जर दॅन लाईफ कृतीला वाव असेल अशा कथांकडे एक निर्माता म्हणून मी जास्त आकर्षित होतो. या गोष्टीबद्दल सुरुवातीला मी थोडा साशंक होतो. पण, जेव्हा मी राम कमल मुखर्जी यांच्याशी बोललो आणि त्यांचा या बद्दलचा दृष्टिकोन जाणून घेतला, तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर काही वेळातच मी निर्माते शैलेंद्र जी, सुजय कुट्टी सर, कृष्ण कुमार सर आणि सूरज शर्मा यांना मुंबईत भेटलो. आमची चित्रपटाबद्दल आणि त्यांना तो चित्रपट कशा पद्धतीने पुढे न्यायचा आहे याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. एकत्र काम करण्याची त्यांची वृत्ती, त्यांच्या मनातील जिव्हाळा या गोष्टींमुळे मी त्यांच्याशी लगेचच जोडला गेलो.
लवकरच होणार कलाकारांची घोषणा!
यावर्षी ‘वंदे मातरम’ची 150वर्षे पूर्ण होत आहेत, हे गीत महर्षी बंकिमचंद्र यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत प्रथम आले होते आणि या गीताने ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना हादरवून टाकले होते. पटकथा लिहिणारे भारतातील सर्वात प्रसिद्ध कथाकार व्ही विजयेंद्र प्रसाद म्हणतात, ‘वन्दे मातरम्’ हा एक जादुई शब्द होता, असे मला वाटते. महर्षी बंकिमचंद्र यांनी राष्ट्राला जुलूम आणि अन्यायाविरुद्द लढण्याकरिता दिलेला हा एक मंत्र होता. स्वातंत्र्य चळवळीची आग पेटवणाऱ्या अनेक अज्ञात योद्धयांची कहाणी आम्ही ‘1770’मध्ये हाताळत आहोत. दिवाळीपर्यंत या चित्रपटातील कलाकारांची घोषणा होणार आहे.
हेही वाचा :
Chatur Chor : 'चतुर चोर' चित्रपटात झळकणार अक्षया-हार्दिकची जोडी, लंडनमध्ये पार पडलं चित्रीकरण!