Phaltan Assembly Election Result 2024 : फलटण विधानसभा मतदारसंघात सचिन पाटील विजयी, दीपक चव्हाण यांचा पराभव
Phaltan Assembly Election Result: सातारा जिल्ह्यातील चर्चेत असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघ होय. या मतदारसंघात दीपक चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला.
सातारा : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण विरुद्ध सचिन पाटील अशी लढत झाली. फलटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात लढत झाली. दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. तर, भाजपच्या सचिन पाटील यांनी ऐनवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. दीपक चव्हाण चौथ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत होते.मात्र, यावेळी त्यांना विजय मिळवता आला नाही. सचिन पाटील यांनी दीपक चव्हाण यांचा पराभव केला. सचिन पाटील यांना 118405 मतं मिळाली. तर दीपक चव्हाण यांना 100372 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार दिगंबर आगवणे यांनी 13581 मतं मिळवली.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्यानं प्रचारात सक्रीय झाले नव्हते.दीपक चव्हाण हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते, चौथ्यावेळी त्यांचा पराभव झाला.
रामराजे यांचं फलटणवर वर्चस्व, 2024 मध्ये धक्का
फलटण विधानसभा मतदारसंघावर रामराजे नाईक निंबाळकर याचं वर्चस्व राहिलं होतं. 2009 पूर्वी हा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी ते या मतदारसंघाचे आमदार होते. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर फलटण हा अनूसुचित जातीसाठी राखीव मतदारसंघ झाला. 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण विजयी झाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात हा मतदारसंघ गेला आहे. इथं, त्यांचे समर्थक सचिन कांबळे, राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर विजयी झाले.
लोकसभेला मतदारसंघात काय घडलं?
फलटण विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघात आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत झाली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. मात्र, फलटण मतदारसंघातून निंबाळकर यांनी आघाडी घेतली. फलटण मतदारसंघात त्यांना 110561 मतं मिळाली होती. तर, धैर्यशील मोहिते पाटील यांना 93633 मतं मिळाली होती.
इतर बातम्या :