मोठी बातमी! एकनाथ शिंदे देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, आता नव्या सरकार स्थापनेला वेग, राज्याचं नेतृत्त्व कुणाकडे?
नव्या सरकारच्या स्थापनेसाठी राज्यात राजकीय घाडमोडींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड करण्यासाठी बैठकांचे सत्र चालू झाले आहे. या निवडणुकीत भाजपा हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे यावेळी महायुतीत मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, असे विचारले जात आहे. असे असतानाच आता मोठी माहिती समोर येत आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
शिंदे देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
मिळालेल्या माहितीनुसार आज (26 नोव्हेंबर) एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. सकाळी 11 वाजता ते आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवतील. या राजीनाम्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेच्या दिशेने पावलं उचलली जातील. शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तरी, नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपाल त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची सूचना करतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीला वेग येईल.
मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
महायुतीमध्ये सर्वांत मोठा पक्ष असल्यामुळे भाजपा मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. तशी भूमिका भाजपातील नेत्यांकडून घेतली जात आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महायुतीने शिंदे यांचाच चेहरा समोर ठेवलेला आहे. लडकी बहीण योजनेचा प्रचार करताना शिंदे हेच समोर होते. त्यांच्यामुळेच महायुतीला यश मिळाले आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षे तरी शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी भूमिका शिवेसना पक्षातील नेत्यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अमित शाह आज मुंबईत येण्याची शक्यता
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरत नसल्याने शपथविधीचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हा पेच दिल्लीतील नेतेच सोडवतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही नव्या सरकार स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्रिपदाची निवड करण्यासाठी मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :