(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha : आर्वीच्या गोल्डमॅन हत्याप्रकरणातील आरोपीच निघाले कारंजा दरोडा प्रकरणातील दरोडेखोर
Wardha Latest Crime News : कारंजातील दरोडा प्रकरणातील टोळी तब्बल पाच महिन्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात, आर्वीच्या गोल्डमॅन हत्या प्रकरणातील आरोपींकडून कारंजातील गुन्ह्याचा खुलासा
Wardha Latest Crime News : जानेवारी 2022 मध्ये कारंजा येथील निवृत्त शिक्षक दांपत्याच्या घरी शस्त्राच्या धाकावर धमकावून,त्यांना डांबून ठेऊन तीन आरोपींनी दरोडा घातला होता आणि घरातील रोख रक्कम तसेच महागडे फोन लुटून पोबारा केला होता.. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच 15 दिवसांपूर्वी आर्वी येथील गोल्डमॅनला सोने लुटून त्याच्याच मोपेड गाडीला बांधून ढकलून देऊन हत्या केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली. ताब्यातील सर्व आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांना समजलं आणि त्यांना खाकी हिसका दाखवला तेव्हा, वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील जानेवारी महिन्यात घडलेल्या निवृत्त शिक्षक दांपत्याच्या घरी देखील याच आरोपींनी दरोडा घातला असल्याचं लक्षात आलं. या आरोपींकडून दरोडा प्रकरणातील सोनं, रोख रक्कम,महागडे मोबाईल फोन्स,असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पूढील तपास सुरू आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कारंजाच्या शिक्षक दांपत्याच्या घरी टाकला होता दरोडा :
कारंजा येथील मुरलीधर विठोबाजी भोयर आणि त्यांची पत्नी दोघेही सेवानिवृत्त शिक्षक असून दिनांक २९ जानेवारी २०२२ ला घरी हजर असतांना कोणीतरी त्यांचे घराची बेल वाजवीली. त्यामुळे भोयर यांनी दार उघडले असता एक इसम त्यांचे घरात आला व एका व्यक्तीचे नाव घेवुन पत्ता विचारला तसेच त्याच्या पाठीमागुन दोन अनोळखी इसम घराचे आत आले.दरोडेखोरांनी शिक्षक दाम्पत्याला धारदार शस्त्र दाखवुन घरात बेडरुम मध्ये डांबुन ठेवले..यादरम्यान झटापट झाल्याने भोयर हे जखमीही झाले होते..दरोडेखोरांनी दाम्पत्याच्या अंगावरील तसेच घरातील सोन्याचे दागीने व नगदी २०,००० रु. असे एकुण १,४१,२५० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता..या घटनेची तक्रार कारंजा पोलिसांत दाखल झाल्यावर पोलिस दरोडेखोरांच्या शोधात होते.
आर्वीच्या गोल्डमॅन हत्या प्रकरणातीलच आरोपी निघाले अट्टल दरोडेखोर :
आर्वी येथे 15 दिवसांपूर्वी एका गोल्डमॅन ला लुटून त्याला त्याच्याच मोपेडला बांधून विहिरीत ढकलून देऊन त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.. याप्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती..त्यातील आरोपी १) अक्षय रमेशराव सतपाळ, २) मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन, ३) विनोद दयाराम कुथे, ४) शेख शाहरुख शेख रऊफ, सर्व रा.आर्वी यांना अटक करण्यात आली होती..विशेष म्हणजे आर्वी गोल्डमॅन हत्येप्रकरणी अटकेत असलेले आरोपीच कारंजा दरोडा प्रकरणातील अट्टल दरोडेखोर असल्याचं निष्पन्न झाले..त्यामुळे अखेर गेल्या पाच महिन्यांपासून पोलीस ज्या आरोपींच्या शोधात होते त्या आरोपिंना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे..आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर,अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी,आर्वी सुनिल साळुंखे व पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, पोलीस अंमलदार गजानन लामसे, गिरीष कोरडे, अतुल भोयर, यशवंत गोल्हर, राजु जयसिंगपुरे, रितेश शर्मा, गोपाल बावणकर यांनी केलीय.