Solapur Crime: सोलापूरमध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ; काळा टी-शर्ट, तोंडाला कपडा.. घरफोडीचं सामान घेऊन फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद
Solapur Crime: ही गँग केवळ शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच नव्हे तर नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरांमध्येही फिरत असल्याचं बोललं जात आहे.

Solapur Crime: सोलापूर शहरात घरफोडीच्या उद्देशाने ‘चड्डी गँग’ पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं समोर आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी वेगवेगळ्या भागांमध्ये संशयास्पद हालचाली करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान शहरातील वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी या परिसरांमध्ये चार संशयित तरुण घरफोडीच्या तयारीत असल्याचं निदर्शनास आलं. विशेष म्हणजे या चौघांनी चेहऱ्यावर कापड बांधलेलं असून, काळा टी-शर्ट आणि केवळ चड्डी परिधान केलेली होती. त्यांच्या हातात दगड आणि घरफोडी करताना उपयोगात येणारी काही साधनं असल्याचं देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलं आहे. (Crime News)
नेमकं प्रकरण काय?
रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास चौघे चोर पूर्णपणे चेहरा बांधून काळा टी-शर्ट आणि चड्डीवर फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारे काही साहित्य असल्याचे ही दिसून येतंय. या गँगकडून घरांची पाहणी करून नंतर चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी दाराच्या बाहेर असलेल्या वस्तू हलविल्या गेल्याचंही निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ पावलं उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.
सोलापूर शहर पोलीस सध्या रात्रीच्या वेळी संशयितांवर लक्ष ठेवत कारवाई करत आहेत. मात्र अशा कारवायांच्या असतानाही चड्डी गँगचा मुक्त वावर पाहायला मिळत आहे, हे गंभीर बाब मानली जात आहे. ही गँग केवळ शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच नव्हे तर नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरांमध्येही फिरत असल्याचं बोललं जात आहे. सदर गँगचे सदस्य स्थानिक आहेत की बाहेरून आलेत, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. एकीकडे कोयता गँगच्या दहशतीच्या चर्चा असताना सोलापूरात चड्डी गँग घरफोडीचं सामान घेऊन फिरत असल्याचं दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा
























