अवघ्या 24 तासात नेतृत्व संपूनही एकट्या इराणने दुबईपासून कुवेतपर्यंत अमेरिकन अन् इस्त्रायली दोस्तांना होरपळून काढलं; इराणी शस्त्रे नेमकी आहेत तरी कशी?
What Are Iran Drone and Ballistic Missile Capabilities: कोणत्याही स्थितीत अमेरिकेशी चर्चेसाठी तयार नसल्याचे सांगत इराणने कडवा प्रतिकार सुरु ठेवला आहे. त्यामुळे अमेरिकेची गोची झाल्याचे बोलले जात आहे.

What Are The Iran Drone and Ballistic Missile Capabilities: इस्रायल-अमेरिका-इराण युद्धाचा आज (2 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. दुबईमध्ये पुन्हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच काही संशयित ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली. सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. सुमारे 16 तासांपूर्वी दुबईच्या बंदर आणि बुर्ज खलिफाजवळ हल्ले झाले होते. बंडखोर हिजबुल्लाह गटही या संघर्षात सामील झाला आहे. त्यांनी इस्रायलमधील अनेक ठिकाणी बॉम्बहल्ला केला आहे.
दुसरीकडे, इस्रायल-अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यासह 48 नेते ठार झाले आहेत. त्यामुळे इराण लष्कर भेदरून शरण येईल, असा कयास इस्रायल-अमेरिकेचा होता. मात्र, तो फोल ठरला आहे. इराणने अमेरिकेचे आखाती देशांमधील लष्करी तळ तसेच मित्र देशांना सुद्धा होरपळून काढण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही स्थितीत अमेरिकेशी चर्चेसाठी तयार नसल्याचे सांगत इराणने कडवा प्रतिकार सुरु ठेवला आहे. त्यामुळे अमेरिकेची गोची झाल्याचे बोलले जात आहे. वाॅशिंग्टन पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार नेतृत्व संपूनही इराणी शस्त्र कोण नियंत्रित करत आहे, त्यांचे नेतृत्व कोणा कडे आहे याबाबत माहिती मिळत नसल्याने पेंटागाँन आणि ट्रम्प प्रशासनही चिंतेत असल्याचे म्हटलं आहे.
इराणचा मुख्य भर क्षेपणास्त्रांवर
दरम्यान, अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, इराणकडे मध्यपूर्वेतील सर्वात मोठे आणि वैविध्यपूर्ण क्षेपणास्त्र (Missile) शस्त्रागार आहे. इराणचे हवाई दल फारसे आधुनिक नसल्यामुळे, त्यांचा मुख्य भर क्षेपणास्त्रांवर आहे, जे त्यांच्या संरक्षणाचा आणि हल्ल्याचा कणा मानली जातात.
1. कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (Short-range missiles - 150 ते 800 किमी)
यामध्ये 'फतेह' (Fateh), 'झोल्फागर' (Zolfaghar) आणि 'शाहाब-1/2' यांचा समावेश होतो.
यांची कार्यप्रणाली आहे तरी कशी?
ही क्षेपणास्त्रे जवळच्या लष्करी लक्ष्यांवर जलद गतीने हल्ले करण्यासाठी बनवली आहेत. ती 'व्हॉली' (volleys) पद्धतीने एकाच वेळी अनेक स्वरूपात डागली जातात, ज्यामुळे शत्रूला पूर्वसूचना मिळण्याचा वेळ खूप कमी होतो आणि त्यांना हवेत नष्ट करणे कठीण जाते.
2. मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (Medium-range missiles - 1500 ते 2000 किमी)
'शाहाब-3' (Shahab-3), 'एमाद' (Emad), 'खोर्रमशहर' आणि 'सेज्जिल' (Sejjil) ही या रेंजमधील प्रमुख आहेत.
यांची कार्यप्रणाली आहे तरी कशी?
या क्षेपणास्त्रांमुळे इस्रायल आणि कतार, बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया व युएईमधील अमेरिकन तळ थेट इराणच्या टप्प्यात येतात. यात 'सेज्जिल' हे घन-इंधनावर (solid-fuel) चालणारे क्षेपणास्त्र असल्यामुळे ते प्रक्षेपणासाठी अत्यंत वेगाने तयार करता येते. liquid-fuel च्या तुलनेत युद्धात वेगाने प्रत्युत्तर देण्यासाठी फायदेशीर ठरते.
3. क्रूझ क्षेपणास्त्रे (Cruise missiles):
'सौमार', 'या-अली', 'पावेह' आणि 'हौवेजेह' ही इराणची क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. 'सौमार' चा पल्ला तब्बल 2500 किमी आहे.
यांची कार्यप्रणाली आहे तरी कशी?
बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारखी ही थेट वरून खाली येत नाहीत, तर ती जमिनीलगत अत्यंत खालून. यामुळे त्यांना रडारवर शोधणे आणि ट्रॅक करणे हवाई संरक्षण यंत्रणेला खूप कठीण जाते.
'वन-वे अटॅक ड्रोन'
ड्रोन हे क्षेपणास्त्रांपेक्षा संथ असले तरी ते खूप स्वस्त असतात आणि मोठ्या प्रमाणावर सहज लाँच करता येतात. इराण एकाच वेळी 'वन-वे अटॅक ड्रोन' (आत्मघाती ड्रोन) मोठ्या संख्येने डागतो, जेणेकरून शत्रूची 'हवाई संरक्षण यंत्रणा' (Air defenses) कमकुवत व्हावी किंवा ती ओव्हरलोड व्हावी. याला 'सॅच्युरेशन टॅक्टिक' (saturation tactic) म्हणतात.
भूगर्भातील 'क्षेपणास्त्र शहरे' (Underground 'missile cities'):
इराणने अनेक वर्षांपासून आपली क्षेपणास्त्रे, प्रक्षेपण केंद्रे आणि साठा जमिनीखालील सुरक्षित भुयारांमध्ये लपवून ठेवला आहे. यामुळे अमेरिका किंवा इस्रायलच्या पहिल्या मोठ्या हल्ल्यातही इराणचे शस्त्रागार सुरक्षित राहते आणि ते दीर्घकाळ आपले हल्ले सुरू ठेवू शकतात.
कमाल पल्ला (Longest-range)
इराणच्या सर्वात लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 2000 ते 2500 किलोमीटरपर्यंत आहे. ती मध्यपूर्वेतील सर्व लक्ष्यांवर पोहोचू शकतात, मात्र ती थेट अमेरिकेपर्यंत (US mainland) पोहोचू शकत नाहीत.
नौदल शस्त्रे आणि हायपरसॉनिक प्रणाली
होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) जहाजांवर हल्ले करण्यासाठी इराण अँटी-शिप क्षेपणास्त्रे, समुद्री सुरुंग (naval mines) आणि वेगवान बोटींचा (fast-attack craft) वापर करतो. तसेच, 'फताह' (Fattah) सारख्या अतिवेगाने आणि दिशा बदलून मारा करणाऱ्या 'हायपरसॉनिक' (hypersonic) शस्त्रांचाही त्यांच्याकडे समावेश असल्याचा इराणचा दावा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























