मोठी बातमी! पुण्यातील कॉलेजचे 80 विद्यार्थी दुबईत अडकले; पालक चिंतेत, शैक्षणिक सहलीनिमित्तच दौरा
पुण्यामध्ये एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दुबईमध्ये गेली असून 80 विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झाले होते

हिंगोली : अमेरिकेनं इराणवर हल्लाबोल केल्यानंतर जागतिक स्तरावर या युद्धजन्य परस्थितीचे परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यातच, आखाती देशांमध्ये हवाई वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आलंय. येथील युद्धसंघर्षाचा परिणाम दुबईवरही झाल्याने दुबई विमानतळावरुन उड्डाण घेणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे, अनेक भारतीय नागरिक, प्रवासी दुबईत (Dubai) अकडून पडले आहेत. इकडे देशात त्यांचे कुटुंबीय काळजीत पडले असून मुलांच्या सुखरुप घरी पोहोचण्याची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील (Pune) एका कॉलेजची शैक्षणिक सहलही दुबईला गेली असून या सहलीतील 80 विद्यार्थी तिकडे अडकले आहेत.
पुण्यामध्ये एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दुबईमध्ये गेली असून 80 विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झाले होते. दुबईत गेलेले हे सर्व विद्यार्थी 1 मार्च रोजी विमानाने भारताकडे परतीचा प्रवास करणार होते. परंतु, ऐनवेळी दुबईतील विमानसेवा बंद झाल्याने हे सर्व 80 विद्यार्थी दुबईमध्ये अडकले आहेत. सध्या ते सुखरूप असून आई-वडील मात्र त्यांच्या काळजीत आहेत. हिंगोलीतील खुशी बढेरा ही विद्यार्थीने याच 80 विद्यार्थ्यांसोबत दुबईमध्ये अडकलेली आहे. खुशीच्या वडिलांनी केंद्र शासनाला विनंती केली आहे की, युक्रेनप्रमाणेच विशेष मोहीम राबवत या 80 विद्यार्थ्यांना केंद्र शासनाने मायदेशी परत आणावे.
रायगड जिल्ह्यातील उत्कर्षही अडकला
ग्लोबल एमबीएच्या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी दुबई येथे गेलेला रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुकामधील उत्कर्ष मपारा हाही दुबईत अकडला असून सध्या सुरक्षित आहे. तो कुटुंबीयांशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती त्यांचे वडील राजेश मपारा यांनी दिली आहे. उत्कर्ष मपारा हा 18 फेब्रुवारी रोजी दुबईत दाखल झाला असून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ते शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कुटुंबीयांमध्ये स्वाभाविकच चिंता आहे. मात्र, उत्कर्ष स्वतंत्रपणे रूम घेऊन राहत असून तो सुरक्षीत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. “आम्ही सर्वजण सतत उत्कर्षच्या संपर्कात आहोत, तो सुरक्षित आहे. मात्र, पालक म्हणून काळजी वाटतेच,” असे त्याच्या पालकांनी सांगितले.
दरम्यान, सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता वाढली असून, परिस्थितीवर लक्ष ठेवत सरकारने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी विनंती पालकांकडून केली जात आहे.























