दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केलं, पूजा खेडकरला बांधून ठेवलं; घरातील नोकराकडून अजब चोरी, नेमकं काय घडलं?
दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करुन तर पुजा खेडकरला बांधुन नोकराने चोरी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
Pune : दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करुन तर पुजा खेडकरला बांधुन नोकराने चोरी केल्याची तक्रार करण्यात आली आहे. खेडकरांच्या घरातील अजब चोरीचा पुणे पोलीसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. आयएएस पदावरुन बडतर्फ करण्यात आलेल्या डॉक्टर पुजा खेडकरने त्यांच्या पुण्यातील घरी काल रात्री चोरीचा प्रकार घडल्याची माहिती फोन करुन चतुःश्रृंगी पोलीसांना दिली आहे.
नोकराने गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले
पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या बंगल्यात खेडकर कुटुंबासह अनेक नोकर रहातात. त्यातील एक नोकर आठच दिवसांपूर्वी नेपाळहून आला होता. त्या नोकराने काल रात्री गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले आणि आपल्याला बांधून ठेवले होते. त्यानंतर तो चोर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला असं पुजा खेडकरने सांगितले आहे. बांधून ठेवलेल्या अवस्थेत असलेल्या पुजाने दाराच्या कडीचा उपयोग करुन स्वतःचे हात मोकळे केले आणि पोलीसांना फोन केला. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलीसांच पथक खेडकर यांच्या घरी पोहोचले असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. पोलीसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मोबाईलच्या व्यतिरिक्त अनेक वस्तू चोरल्याची माहिती
पुजा खेडकरने स्वतः दुसऱ्या फोनवरुन फोन करुन हा प्रकार पोलिसांना कळवला आहे. मात्र तीने अद्याप लेखी तक्रार पोलीसांकडे दिलेली नाही. आपली मनस्थिती व्यवस्थित झाली की आपण तक्रार देऊ असं तिनं पोलिसांना सांगितलं आहे. मोबाईलच्या व्यतिरिक्त घरातील आणखी कोणत्या वस्तू चोरी झाल्या आहेत, याचीही माहिती तिनं अद्याप पोलीसांना दिलेली नाही.
यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याचा पूजा खेडकरवर आरोप
पूजा खेडकर वर यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून जास्त अटेंम्पट मिळवल्याचा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर 2024 ला तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पूजा खेडकर प्रकरणात प्रथमदर्शी “मोठा कट” असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं. यूपीएससीने खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षांसाठी बंदी घातली आहे. मात्र पूजा खेडकर हिने सर्व आरोप फेटाळले आहे.
महत्वाच्या बातम्या:
UPSC Website Changed : पूजा खेडकरसारख्या प्रकरणांना बसणार चाप, UPSC ची वेबसाइट बदलली, आता नव्या पोर्टलवरूनच करावा लागणार अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस























