UPSC Website Changed : पूजा खेडकरसारख्या प्रकरणांना बसणार चाप, UPSC ची वेबसाइट बदलली, आता नव्या पोर्टलवरूनच करावा लागणार अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
UPSC Website Changed : केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्ज करण्यासाठी नवीन ऑनलाइन अर्ज पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे उमेदवार आता सहजपणे ऑनलाइन नोंदणी करू शकतील.

UPSC Website Changed : यूपीएससी भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) अर्ज करण्यासाठी नवीन ऑनलाइन अर्ज पोर्टल (UPSC New Online Application Portal) सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे उमेदवार आता सहजपणे ऑनलाइन नोंदणी करू शकतील आणि अर्ज भरू शकतील. हे नवीन पोर्टल 28 मे 2025 पासून कार्यान्वित झाले आहे. याचा वापर सीडीएस परीक्षा-II 2025 तसेच एनडीए व एनए-II 2025 साठी अर्ज करण्यासाठी केला जाणार आहे.
पूजा खेडकर प्रकरणात वेगवेगळ्या नावांसह जास्त वेळा परीक्षा दिल्याचा प्रकार लक्षात आल्यावर यूपीएससीकडून ऑनलाइन पोर्टलमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने सुधारणा करण्याविषयीची प्रक्रिया गेली अनेक महिने सुरू होती. यूपीएससीचं जुनं अर्ज पोर्टल https://upsconline.gov.in/upsc/OTRP/index.php हे होतं, तर नवीन पोर्टल https://upsconline.nic.in सुरू करण्यात आलं आहे.
चार टप्पे पार करावे लागणार
नवीन यूपीएससी ऑनलाइन अर्ज पोर्टलमध्ये चार मुख्य भाग असतील, जे होम पेजवर चार वेगवेगळ्या कार्ड्सच्या स्वरूपात दिसतील. अकाउंट तयार करणे, युनिव्हर्सल नोंदणी, आणि कॉमन अर्ज फॉर्म हे सर्व परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या सामान्य माहितीशी संबंधित असतील. उमेदवार या तिन्ही भागांमध्ये कधीही माहिती भरू शकतात आणि गरज भासल्यास त्यात बदल (अपडेट) देखील करू शकतात. चौथा भाग म्हणजे परीक्षा, ज्यामध्ये परीक्षेशी संबंधित सूचना, अर्ज आणि अर्जाची स्थिती यासारखी माहिती समाविष्ट असेल. या भागामध्ये उमेदवारांना फक्त परीक्षा-विशिष्ट माहिती भरावी लागेल, जी संबंधित परीक्षेच्या अधिसूचनेत दिलेल्या कालावधीत उपलब्ध असेल.
या नव्या प्रणालीमुळे उमेदवारांना मोठी सुविधा होणार आहे. ते पहिले तीन भाग आधीच भरून तयार ठेवू शकतात, त्यामुळे परीक्षेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर त्यांना फक्त परीक्षा-संबंधित माहिती भरावी लागेल. यामुळे वेळेची बचत होईल आणि शेवटच्या क्षणी होणाऱ्या घाईगडबडीपासून सुटका मिळेल.
आता नव्या पोर्टलवरूनच करावा लागेल अर्ज; जुना OTR मोड्यूल अमान्य
UPSC ने सर्व उमेदवारांना सूचना दिली आहे की, यापुढे नवीन पोर्टल (https://upsconline.nic.in) वर नव्याने अर्ज करावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. जुनं वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) मॉड्यूल आता वैध राहणार नाही. पोर्टलच्या होमपेजवर तसेच सर्व प्रोफाइल/मॉड्यूल्समध्ये सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, ज्या उमेदवारांना अर्ज भरताना आणि कागदपत्र अपलोड करताना मदत करतील.
UPSC ने हेही सुचवलं आहे की, उमेदवारांनी आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापरावं. यामुळे ओळख आणि इतर तपशीलांची पडताळणी अधिक सुलभ, जलद आणि अचूक होईल. आधार कार्डाच्या आधारे दिलेली माहिती सर्व परीक्षांसाठी स्थायी आणि सामान्य रेकॉर्ड म्हणून वापरली जाईल.
UPSC च्या या नव्या उपक्रमामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि वापरकर्त्यांसाठी सोपी होणार आहे. उमेदवारांनी नवीन पोर्टलचा वापर करून वेळेत आपले अर्ज पूर्ण करावेत, अधिक माहितीसाठी https://upsconline.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे UPSC ने म्हटले आहे.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI


















