SBI Bank Fraud : ऑनलाईन बेटिंगच्या नादात बँक मॅनेजरचाच SBI बँकेवर डल्ला, तीन कोटींचं सोनं लुटलं; मुंबईच्या भांडुपमधील धक्कादायक प्रकार
SBI Bank Fraud Case : या प्रकरणी भांडुप पोलिसांनी एसबीआय बँक मॅनेजर आणि सोनं विकण्यास मदत करणारा अशा दोन जणांना अटक केली आहे.
SBI Bank Fraud Case : मुंबई : ऑनलाईन बेटिंगच्या (Online Betting) नादात भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) मॅनेजरनेच तीन कोटी रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन बेटिंग खेळण्याचा नाद लागलेल्या एका बँक मॅनेजरने बँकेचे लॉकर फोडून त्यातील सुमारे तीन कोटी रुपयांचं सोनं चोरी करून विकल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप पश्चिम येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी एसबीआय बँक मॅनेजर आणि सोनं विकण्यास मदत करणारा अशा दोन जणांना अटक केली आहे.
बँक मॅनेजरनेच लुटली स्वतःची बँक
मनोज म्हस्के असं या मॅनेजरचं नाव असून फरीद शेख असं दुसऱ्या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मनोज म्हस्के हा एसबीआय बँक मुलुंड शाखेच्या पर्सनल ब्रांच सर्व्हिस मॅनेजर म्हणून नोकरीला होता. तर फरीद शेख मॅनेजर मनोजला सोनं विकण्यास मदत करत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
तीन कोटींच्या सोन्यावर डल्ला
मुलुंड - नाहूर येथील रूनवाल ग्रीन या ठिकाणी असलेल्या एसबीआयच्या शाखेत प्रशासक म्हणून काम करणारे अमित कुमार यांनी भांडुप पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार बँकेत ग्राहकांनी सोनं गहाण ठेवून घेतलेल्या कर्जातील जवळपास तीन कोटी रुपयांचे सोनं बँकेच्या लॉकरमधून गहाळ झाल्याचं समोर आलं आहे. या लॉकरच्या दोन चाव्या आहेत आणि फक्त दोन्ही चाव्या वापरूनच हे लॉकर उघडता येतात, त्यापैकी एक चावी सर्व्हिस मॅनेजरकडे असते आणि दुसरी शाखेत कॅश इनचार्ज म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे असते.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारीला मनोज म्हस्के रजेवर असताना प्रशासक अमित कुमार यांच्याकडे लॉकरची जबाबदारी होती. अमित कुमार लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पाकिटे गायब असल्याचे दिसले. त्यांनी कागदपत्रे व्यवस्थित तपासली असता, बँकेच्या या शाखेने सोनं तारण ठेवून 63 ग्राहकांचे सोनं तारण ठेवून कर्जे दिली होती. लॉकरमध्ये असलेल्या 63 सोन्याच्या पाकिटापैकी 59 पाकिटे गहाळ झाली होती आणि लॉकरमध्ये फक्त 4 पाकिटे शिल्लक होती.
सोनं गायब केल्याची मॅनेजरची कबुली
अमित कुमार यांनी ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. बँक अधिकारी यांनी सुट्टीवर असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के याला तातडीने बँकेत बोलावून त्याच्याकडे गहाळ झालेल्या सोन्याच्या पाकिटाबाबत चौकशी केली असता, ती त्यानेच गहाळ केल्याची कबुली देत यापैकी काही सोन दुसरीकडे तारण ठेवले तर, काही सोनं विकल्याची कबुली दिली. मी लवकरच सोनं परत करतो, असे बोलून त्याने बँकेकडे वेळ मागून घेतला, पण बँकेने त्याला कुठलाही वेळ न देता भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ऑनलाईन सट्ट्याच्या नादात बँकेतील सोन्यावर डल्ला
भांडुप पोलिसानी भादंवि कलम 409 अन्वये गुन्हा दाखल करून मनोज म्हस्के आणि त्याचा साथीदार शेख याला अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मनोज म्हस्के याला ऑनलाइन सट्टा खेळण्याची सवय आहे. म्हस्के याने सोनं कुठे गहाण ठेवलं याबद्दल पोलीस तपास करत आहेत, अशी माहितीभांडुप पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिली आहे.