पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Republican Party of India: राजीनामा दिलेले माजी उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनी महायुती विरोधात भूमिका घेतली आहे. महायुतीला मतदान न करण्याची कार्यकर्त्यांना शपथ दिली आहे.
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना मोठा धक्का बसला आहे. महायुतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवलेंच्या पक्षाला) सन्मानपूर्वक वागणूक देत नसल्यानं सांगत माजी उपमहापौर, रिपाइंचे नेते डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्या राजीनाम्यामुळे वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच राजीनामा दिलेले माजी उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनी महायुती विरोधात भूमिका घेतली आहे.
राजीनामा दिलेले माजी उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनी महायुती विरोधात भूमिका घेतली आहे. महायुतीला मतदान न करण्याची कार्यकर्त्यांना शपथ दिली आहे. पुण्यात स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शपथ दिली आहे. आरपीआय आठवले गटाला गृहीत धरून महायुती काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने फसवणूक केल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे. आंबेडकरी जनतेची खदखद आहे, आम्हाला एकही जागा देण्यात आली नाही. भाजपने एक जागा दिली. मात्र, इतर पक्ष तर विचारायला तयार नाहीत, आठवले मंत्री असल्याने ते काही बोलत नाहीत, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीने रिपाइंला एकही जागा दिली नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये रिपाइं पक्षाला स्वंतत्र निवडणूक चिन्ह असूनही प्रतिनिधित्व देण्यास टाळाटाळ केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचंही,’ डाॅ. धेंडे यांनी राजीनामा देत आठवले यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.