(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed Crime : बीडच्या पोलीस अधीक्षकांचं फेसबुक अकाउंट हॅक, सायबर विभाग अॅक्शन मोडमध्ये
Beed Crime News : बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलं असून त्यांच्या अकाउंटवरुन पैशांची मागणी करण्यात आली आहे.
Beed Crime News : यापूर्वी तुम्ही फेसबुक अकाउंट (Facebook Account Hacked) हॅक करून पैसे मागितल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. बीडमध्ये (Beed) मात्र चक्क पोलीस अधीक्षकांचंच फेसबुक अकाउंट हॅक करून त्याद्वारे पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर बीडचा संपूर्ण सायबर विभाग या हॅकर्सचा शोध घेत आहे.
बीडचे पोलीस अधीक्षकानंद कुमार ठाकूर यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून एका हॅकरनं पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वी सर्वसामान्यांचं अकाउंट हॅक व्हायचं, मात्र या प्रकरणात हॅकर्सचे हात थेट खाकीपर्यंत पोहोचल्यानं बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचं वैयक्तिक फेसबुक अकाउंट असून त्यांचे प्रोफाइल त्यांनी लॉक केलेले असतानाही एका हॅकर्सनं त्यांचं बनावट प्रोफाईल तयार केलं. त्यावर डीपी ही त्यांच्या मूळ अकाउंटचा ठेवला आणि त्यांच्या फोटोच्या आधारे अनेकांकडे पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर या भामट्या हॅकरनं नंदकुमार ठाकूर यांचं बनावट व्हाट्सअप अकाउंट देखील काढलं आणि त्याद्वारे देखील पैसे मागितले. सुदैवानं काही लोकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांनाच फोन करून याबाबत विचारणा केली. नंदकुमार ठाकूर यांनी आपलं अकाउंट चेक केलं आणि ते हॅक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे कोणीही या भामट्या हॅकर्सला आतापर्यंत पैसे पाठवले नाहीत.
या सर्व प्रकरणानंतर आता बीडचा सायबर विभाग ॲक्शन मोडमध्ये आला असून थेट खाकी वरच हात टाकणाऱ्या या भामट्या हॅकरला पकडण्यासाठी तांत्रिक गोष्टींचा तपास सुरू झाला आहे. एकीकडे वेगवेगळ्या युक्त्या वापरून सर्वसामान्यांना लुटणाऱ्या भामट्या हॅकर्सचे हात थेट पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचले आहेत. त्याला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :