एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
MNS : एकीकडे राज ठाकरे मशिदीवरील भोंग्याविरोधात सभांमधून जोरदार भूमिका मांडत असतात. दुसरीकडे या भूमिकेचा फटका बसू नये म्हणून दिलीप धोत्रेंनी मुस्लीम बांधवांना यात्रा घडविली.
पंढरपूर : लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले असताना मनसेकडून (MNS) जाहीर झालेल्या पहिल्या यादीतील उमेदवार व मनसे नेते दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) हे मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी आज अजमेर शरीफ (Ajmer Sharif) यात्रेसाठी निघाले आहेत. जवळपास १००० मुस्लीम मतदारांना आराम बसमधून घेऊन या यात्रेला सुरुवात झाली आहे.
निवडणुकीपूर्वी हा अनोखा फंडा मनसेने वापरण्यास सुरुवात केली असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गोरगरीब मुस्लीम समाजाला घेऊन दिलीप धोत्रे हे अजमेर शरीफ येथे दर्शनासाठी निघाले आहेत. एका बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदीवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज याच्या विरोधात सभांमधून जोरदार भूमिका मांडत असताना आपल्याला या भूमिकेचा फटका बसू नये म्हणून दिलीप धोत्रे यांनी मतदारसंघातील मुस्लीम बांधवांना ही यात्रा घडविली आहे.
दिलीप धोत्रेंकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
आता अजमेर शरीफनंतर पुढच्या आठवड्यात हिंदू बांधवांसाठी काशी यात्रा तर यानंतर नागपूर येथील बौद्ध बांधवांसाठी नागपूर येथील दीक्षाभूमीला देखील मतदारांना घेऊन जाणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे. निवडणुकीपूर्वी दिलीप धोत्रे यांनी सुरू केलेल्या या अनोख्या फंड्यामुळे इतर पक्षाचे उमेदवार ही आता सावध होणार आहेत. विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर व्हायची असली तरी मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी आत्तापासूनच मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरलेले फंडे त्यांना निवडणुकीत फायदेशीर ठरणार का? हे काळच ठरवेल.
यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप
दरम्यान, भाजपबरोबर सरकार स्थापन केल्याने महायुतीतील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटापासून राज्यातील मुस्लीम न समाज दुरावला असल्याचे चित्र आहे. एकगठ्ठा मतपेटी असलेल्या या समाजाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकर्षित करण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गट करत असल्याचे दिसून येत आहे. भायखळा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी मुस्लीम महिलांसाठी बुरखा वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावर भाजपने (BJP) आक्षेप घेतल्याने महायुतीत गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सकाळ-संध्याकाळ हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख निमा करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला आता मुस्लीम समाजाची गरज वाटू लागली का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
आणखी वाचा
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक