Laser Lights Banned in Kolhapur : दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
Laser Lights Banned in Kolhapur : तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर धोका लक्षात घेऊन अखेर अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
![Laser Lights Banned in Kolhapur : दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी! Laser lights banned in ganesh immersion procession in Kolhapur! Laser Lights Banned in Kolhapur : दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/fc2dfa9bf2eda776b00c8cfc55735f241726204860202736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Laser Lights Banned in Kolhapur : कोल्हापुरात गणेशोत्सव आगमन मिरवणुकीलाच करवीर तालुक्यातील उचगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेसर किरणांचा प्रखर विद्युतझोत वापरण्यात आला होता. या विद्युतझोताची किरणे थेट डोळ्यावर पडल्याने तरुणाचा डोळा लाल झाल्याची घटना घडली होती. टेंबलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेसरमुळे त्रास जाणवू लागला होता. या दोन गंभीर घटना घडल्यानंतर आता कायद्याचे डोळे उघडले आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सना बंदी घातली आहे. कार्यवाहीसाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार आहे.
लाईट्स जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल
जिल्हा प्रशासनाने बंदी आदेश जारी करताच पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी लेसर लाईट्सचा वापर करू नये, अन्यथा संबंधित मंडळांच्या लाईट्स जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. लाईट्स आणि ध्वनियंत्रणा पुरवणा-या संघटनेसही पोलिसांनी बंदी आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर धोका लक्षात घेऊन अखेर अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (1) नुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
लेसर लाईट्सवर कारवाईसाठी तक्रारींचा ओघ
गणेश आगमन मिरवणुकांमध्ये सार्वजनिक मंडळांनी लेसर लाईट्सचा झगमगाट केला. मात्र, अतितीव्रतेच्या लाईट्समुळे उचगाव येथील एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली. मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या अनेकांना लेसर लाईट्सचा त्रास झाला. याबाबत नियंत्रण कक्षाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. डोळ्यांवर उपचार करणारे ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. चेतन खारकांडे यांनीही लेसर लाईट्सवर बंदी घालण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली होती. दरम्यान, कोल्हापुरात राजारामपुरीमध्ये लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यात आले. कोल्हापूर हे असं शहर ज्या शहरात आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक देखील मोठ्या उत्साहात काढली जाते. राजारामपुरी परिसरातील 54 हून अधिक गणेश मंडळं या आगमन मिरवणुकीत सहभागी होतात. ही आगमन मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)