वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने तरुणाला बोलावून पेट्रोल टाकून जिवंत पेटवलं
बीड जिल्ह्यातील धारूरच्या घाटात वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने तरुणाला बोलावू पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली आहे.
बीड : आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे. त्यासाठी तू ये असा निरोप देऊन एकोणीस वर्षाच्या युवकाला बोलावून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या दिंद्रुड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या धारूरच्या घाटात घडली आहे.
धारुर तालुक्यातील नाकलगाव इथला 19 वर्षाच कृष्णा अर्जुन गायकवाड हा बुधवार रात्री साडेआठ वाजता आपल्या गावातील किराणा दुकानासमोर थांबला होता. त्यावेळी त्याचा मित्र आदिनाथ सुधाकर गायकवाड याचा फोन आला. आपल्याला मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तू रस्त्यावर ये, कृष्णा आदिनाथच्या बोलण्यावरून वाढदिवस साजरा करण्यासाठी रस्त्यावर गेला. त्यावेळी आदिनाथ आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतर 4 लोकांनी कृष्णाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोत्यात टाकून चारचाकी वाहनातुन सोन्निमोहा ते धारूर घाटाच्या परिसरात गाडीतून फेकून दिले. धारूरच्या घाटात बेशुद्धावस्थेत असलेल्या कृष्णाकडे रात्री कुणाचीही नजर गेली नाही.
कृष्णाला त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत मारण्याच्या उद्देशाने पेटवून देऊन ते चार जण निघून गेले. यावेळी काही वेळाने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या कृष्णाला जवळील वस्तीवरच्या लोकांनी आपल्या वस्तीवर आणून जखमी कृष्णाच्या नातेवाईकांना फोन करून सदरील घटनेची माहिती दिली.
सध्या कृष्णावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. कृष्णाचे चुलते भीमराव निवृत्ती गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिनाथ सुधाकर गायकवाड आणि इतर तीन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार आहेत.