Pune Crime : पुण्यातील मंडई परिसरात तरुणावर पूर्ववैमनस्यातून हल्ला, कोयत्याने वार करुन गोळीबार
Pune Crime : पुण्यातील मंडई परिसरात एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली
Pune Crime : पुण्यातील (Pune) महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर कोयत्याने वार करत गोळीबार (Firing) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (27 डिसेंबर) रात्री एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
शेखर शिंदे नावाचा हा तरुण रात्री नऊ वाजता रामेश्वर चौकातून जात होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांनी पिस्तुलातून गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या शेखर शिंदेला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून पुढील तपास सुरु आहे.
वारजे परिसरात काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना
पुण्यात गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या दहशतीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील वारजे इथल्या रामनगरमधील वेताळबाबा चौकात गोळीबाराची घटना घडली होती. कार्तिक इंगवले नावाच्या आरोपीने दारुच्या नशेत असताना गोळीबार केला. कार्तिक इंगवलेचा मित्र वेताळबाबा चौकामधून चालला होता. त्यावेळी कार्तिकने त्या मित्राकडून 500 रुपये मागितले होते. त्याने पैसे नाही दिले म्हणून कार्तिक इंगवलेने त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. दरम्यान पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच काही वेळातच गोळीबाराची घटना समोर आली होती. त्यामुळे गोळीबार करणाऱ्या आरोपींनी पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांना सलामी दिल्याची चर्चा रंगली होती.
हेही वाचा
Pune Crime news : चक्क 'काजू कतली' फुकट मिळावी यासाठी तरुणांकडून गोळीबाराचा प्रयत्न; पुण्यातील घटना