HMVP व्हायरसची शेअर बाजारालाही 'लागण', परकीय गुंतवणूकदारांचा काढता पाय, स्टॉक मार्केटमध्ये मोठी पडझड!
HMVP व्हायरसचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. चीनमधून आलेल्या या व्हायरसचा शिरकाव भारतातही झाला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर पडला आहे.
मुंबई : गेल्या काही वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महासाथीने संपूर्ण जगरहाटी थांबवली होती. करोना विषाणूमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. या महासाथीतून सावरत असतानाच आता चीनमधूनच आणखी एका विषाणूचा उगम झाला आहे. या विषाणूचे नाव HMPV असून चीनमध्ये अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, याच विषाणूचा प्रसार जगभरात होत असल्यामुळे भारतीय शेअर बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम झाल्याचं दिसतंय. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची जगभरात होत असलेली लागण पाहून परकीय गुंतवणूकदार भारतीय शेअर बजारातून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत.
परकीय गुंतवणूकदारांकडून पैसे काढण्यास सुरुवात
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा भारतातही शिरकाव झाला आहे. देशात सर्वप्रथम बेंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुरडीला या विषाणूची लागण झाली आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातली लोकांसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. याच विषाणूच्या प्रसाराचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम पडला आहे. भारतात एचएमपीसीच्या केसेस आढळल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. सोबतच परकीय गुंतवणूकदारांकडून समभागांची विक्री केली जात आहे. असे असतानाच अनेक कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीचे आकडे या आठवड्यात असल्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे. पीएसयू बँक, रिअल इस्टेट आणि आॅइल अँड गॅस क्षेत्रातील समभागात गुंतवणूकदारांकडून हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय शेअर बाजारात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावं?
खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करणं टाळावं?
खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच
आयसोलेट करावं.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.
लक्षणं काय?
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा एक व्हायरस आहे, ज्याची लक्षणं सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखीच असतात. सामान्य प्रकरणांमध्ये, यामुळे खोकला किंवा घरघर, वाहणारं नाक किंवा घसा खवखवणं होतो. लहान मुलं आणि वृद्धांमध्ये, एचएमपीव्ही संसर्ग गंभीर असू शकतो. या व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर लक्षणं दिसू शकतात.
हेही वाचा :