(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adani Share News : शेअर बाजारातील घसरण थांबवण्यासाठी अदानी समूहाचा मोठा 'हा' डाव
Adani Share News : गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अदानी समूहाने मोठा डाव खेळला आहे. जवळपास एक अब्ज डॉलरचे कर्ज कंपनी फेडणार असून तारण ठेवलेले शेअर्स सोडवणार आहे
Adani Share News : अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या रिसर्च रिपोर्टमुळे अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर दरात (Share Market) मोठी घसरण दिसून येत आहे. शेअर बाजारातील घसरण थांबवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी अदानी समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाने 1.1 अब्ज डॉलरचे कर्ज मुदतीआधीच (Loan Prepayment) फेडले आहे. हे कर्ज फेडून अदानी समूहाने तारण ठेवलेले शेअर्स सोडवून (pledge on shares) घेतले आहेत. याद्वारे कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न कंपनीने केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
'रॉयटर्स' आणि इतर वृत्तसंस्थांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. अदानी समूहाने आपले शेअर्स सोडवून घेतले आहेत. कंपनीच्या प्रवर्तकांनी याबाबत निर्णय घेत तारण ठेवलेले शेअर्स सोडवून घेतले आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर मागील 9 दिवसांपासून अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण सुरू झाली आहे.
कोणत्या कंपनीचे गहाण ठेवलेले शेअर्स सोडवले?
वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, अदानी पोर्टस अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (Adani Ports & Special Economic Zone), अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) आणि अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) या कंपन्यांचे गहाण ठेवलेल्या शेअर्स सोडवून घेतले आहेत. अदानी ट्रान्समिशनचे तिमाही निकाल सोमवारी, 6 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. तर, अदानी पोर्ट्सचे तिमाही निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे.
अदानी पोर्ट्सच्या प्रवर्तकांनी गहाण ठेवलेले 12 टक्के शेअर्स सोडवून घेतले आहेत. अदानी ग्रीनच्या प्रमोटर्सने गहाण ठेवलेले 3 टक्के आणि अदानी ट्रान्समिशनच्या प्रवर्तकांनी 1.4 शेअर्स सोडवून घेतले आहेत. त्यानंतर आता अदानी पोर्टसचे 5.31 टक्के शेअर्स तारण म्हणून ठेवण्यात आले आहे. अदानी ग्रीनचे 1.36 टक्के, अदानी ट्रान्समिशनचे 5.22 टक्के शेअर्स तारण म्हणून ठेवण्यात आले आहेत.
कंपन्यांचे शेअर्स तारण का ठेवले जातात ?
कंपन्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अनेकदा अतिरिक्त पैशांची गरज भासते. यासाठी बँका अथवा बाजारातून पैसे घेतले जातात. बँकेकडून कर्ज घेताना काही मालमत्ता तारण ठेवावी लागते. यामध्ये कंपन्या आपल्या शेअर्स तारण ठेवून कर्ज घेऊ शकतात. बँकांकडून बाजारभावाच्या एका निश्चित प्रमाणाच्या आधारे कर्ज दिले जाते.