राष्ट्रीय लसीकरणाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण देशात दीड लाखांपेक्षा अधिक तर राज्यात अठरा हजारापेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली. मात्र, त्याच दिवशी रात्री उशिरा 'कोविन' अॅपमधील तांत्रिक अडचणीमुळे लसीकरण दोन दिवस स्थगित करण्याचा निर्णय राज्याने घेतला. देशात सिरम इन्स्टिट्यूट निर्मित कोविशील्ड आणि भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सीन या दोन लसीच्या आधारावर लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असताना काही ठिकाणी कोवॅक्सीनच्या लसीला घेऊन प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यानंतर लसीकरणाचा हा कार्यक्रम संपूर्ण आठवडा चालणार नसून आठड्यातील केवळ चारच दिवस सुरु राहणार असल्याची भूमिका राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे.
आपल्याकडे आजही म्हणावं तितक्या प्रमाणात डिजिटल व्यवस्थेचे सबलीकरण झालेले नाही, याची प्रचिती सर्व देशवासियांना अनेक टप्प्यावर येत असते. 10-12 बोर्डाचे आणि नीट परीक्षांचे निकाल असो वा अन्य स्पर्धात्मक परीक्षाची माहिती देणाऱ्या, तसेच महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या वेबसाईट आणि अॅप अनेकवेळा 'क्रॅश' झाल्याचा अनुभव आहेच. त्यामुळे नागरिकांनी या सर्व घटनांना घेऊन लसीकरण मोहिमेबद्दल उलट-सुलट चर्चा न करता केंद्र सरकार यातून तोडगा काढेल यावर विश्वास ठेवून थोडा धीर ठेवून लसीकरण मोहीम यशस्वीपणे कशी राबविली जाईल याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आरोग्याच्या या आणीबाणीत कोरोना विरोधातील लस ही अनेक नागरिकांसाठी जगण्याची उमेद आहे. त्यामुळे लसीबद्दल संभ्रम निर्माण होईल असे वातावरण तयार होणे हे समाजासाठी धोकादायक आहे.
पहिल्या दिवशी लस घेतल्यानंतर देशातील काही जणांना त्याचे सर्वसाधारण दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) दिसले आहेत. मात्र, लसीकरणाच्या या प्रक्रियेत काही लोकांना असे दुष्परिणाम या अगोदर सुद्धा दिसले होते. ज्यावेळी या लसीला आपातकालीन वापराकरिता मान्यता मिळाली त्यावेळी 3 जानेवारी रोजी व्ही जी सोमाणी, भारतीय औषध नियंत्रक, यांनी लसीच्या सुरक्षिततेबाबतीत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते कि, "आम्ही लशीला परवानगी देताना सुरक्षिततेचा संपूर्ण विचार केला आहे. ही लस 110% सुरक्षित आहे. थोडा ताप, दुखणे आणि साधारण ऍलर्जी सारखे साईड इफेक्टस जे कोणत्याही लशीत असतात." हे जाहीर केले होते. लसीकरणासारख्या महत्तवकांशी मोहिमेत अजून बरेच अडथळे पार करत पुढे जावे लागणार आहे. लसीला परवानगी देताना त्या लसीची उपयुक्तता, सुरक्षितता आणि परिणामकारता याचा विचार आग्रहाने केला जातो. त्यामुळे प्रत्येकवेळी एखादी अप्रिय घटना घडली तर त्याचे खापर पूर्ण मोहिमेवर फोडणे चूक आहे. या विषयावर वैद्यकीय आणि विज्ञान जगतातील तज्ञ विचार विनिमय करून योग्य रणनीती आखून तोडगा काढतील असा विश्वास ठेवला पाहिजे. जर लसीकरणाला घेऊन काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याचा तात्काळ बंदोबस्त केलाच गेला पाहिजे. लसीचा संबंध हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे यामध्ये चालढकल केलीच जाऊ नये. मात्र विनाकारण उगाचच नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण करणे चुकीचे आहे. लस निर्मितीवर देशातील-परदेशातील तज्ञ शास्त्रज्ञांनी काम केले आहे.
याप्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की," लसीकरणाबाबतच्या सर्व नोंदी ह्या कोविन अॅप मार्फतच कराव्यात अशा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचना आहेत. अॅपमध्ये योग्य पद्धतीने नोंदणी झाली नाही तर लसीकरणाच्या संदर्भातील माहितीचे संकलन, तसेच भविष्यात पाठपुरावा करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लसीकरणासाठी अॅपचा वापर करण्याच्या सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. या अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, त्याकरिता दोन दिवस मोहीम स्थगित करण्यात आली आहे. लवकरच मोहीम सुरु होईल याबाबत मला विश्वास नाही तर खात्री आहे. कोवॅक्सीनला घेऊन काही किंतु परंतु असण्याचे कारण नाही. ती लस सुरक्षित आहे, माझी लसीकरणाची वेळ येईल त्यावेळी मी हीच लस घेईन. नागरिकांनी लसीकरणाच्या उलट सुलट चर्चेला घेऊन काही घाबरण्याचे कारण नाही. केंद्र सरकाच्या आरोग्य विभागाशी आमचा व्यवस्थित संपर्क असून वेळोवेळी जे काही आमचे प्रश्न असतात, आम्ही ते सातत्याने उपस्थित करत असतो. विशेष म्हणजे लसीकरण मोहीम ही आठवडाभर चालणार नसून चारच दिवस चालणार आहे. लसीकरणाबाबत नागरिकांना काही सूचना असल्यास त्याबाबत माध्यमांतून त्यांना कळविण्यात येईल. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका. नागरिकांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम यशस्वी करायची आहे."
आपल्याकडील हा गोंधळ आणि तांत्रिक त्रुटी सुरु असतानाच यूरोपातील नॉर्वेमध्ये फायझर बायोटेकची लस घेतल्यानंतर 29 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनेची बातमी येऊन धडकली. खरं तर या घटनेशी आपल्या येथील लसीकरणाच्या मोहिमेशी दुरान्वये संबंध नाही. कारण ह्या लशीला अजून तरी भारतात परवानगी मिळालेली नाही. तरी ह्या बातमीला घेऊन सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. साहजिकच या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. मात्र ज्या 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा या लस घेतल्यामुळे मृत्यू झाला कि या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे याचाही शोध घेतला जात आहे. लसीकरण मोहीम हाती घेत असताना नागरिकांना विश्वासात घेणे फार गरजेचे असते. जी लस नागरिकांना देणार आहोत त्याबाबतची इत्यंभूत माहिती विज्ञान जगतासमोर मांडली गेली पाहिजे अशी मागणी होणे रास्त आहे.
जानेवारी 15 ला 'गो कोरोना गो ला आरंभ!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, उद्या संपूर्ण देश कोरोना सारख्या आजाराला नायनाट करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकणार आहे. खऱ्या अर्थाने देशात उद्भवलेल्या आरोग्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. नागरिकांच्या मनात लशील घेऊन मोठी उत्सुकता आहे. देशातील आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा लसीकरण यशस्वी होण्याच्या दिशेने सज्ज झाली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबई शहरात 4 हजार जणांना लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे, यासाठी नऊ केंद्रावर 40 कक्ष कार्यरत करण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरणाच्या या पर्वाची सुरुवात होत असली तरी हे मोठे काम असून यामध्ये काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्या काही चुका होतील त्यावर कोणत्याही पद्धतीचे 'राजकारण' न करता यशस्वीरित्या तोडगा काढून ही मोहीम पुढे कशी जाईल यासही सर्वांनी मिळून प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सध्या तरी ही लस प्राधान्यक्रमाने आरोग्य व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना देणार असले तरी काही महिन्यानंतर सर्व सामान्यांना ही लस टोचण्यात येणार आहे. लस मोहिमेस सुरवात होत असली तरी गेल्या काही दिवसात दररोज कोरोनाच्या आजाराचे सुमारे 3000 नवीन रुग्ण राज्यात दिसत आहे तर 50 पेक्षा अधिक मृत्यू रोज होत आहेत. त्यामुळे कोरोना अजूनही राज्यात धिंगाणा घालतच आहे, हे यावेळी कुणी विसरता कामा नये.
लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली असताना अशा अचानक पद्धतीने दोन दिवसांकरिता कुठल्याही कारणाने स्थगिती येणे हे सर्वसामान्यांच्या मनाला पटण्याजोगी बाब नाही हे खरं आहे. मात्र, राज्य सरकाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाच्या विरोधातील लस हे एकमेव शस्त्र सध्या आपल्याकडे आहे. त्याचा वापर कसा करायचा आहे ते आता आपल्याला ठरवावे लागणार आहे. अनेक नागरिकांना ह्या लसीच्या आगमनामुळे हायसे वाटले आहे, भले त्यांना ती लस मिळायला अजून खूप उशीर आहे. तसेच काही जणांना तर कोरोनाच्या ह्या काळात मानसिक आजारांना सामोरे जावे लागले होते, काहींनी जगणायची आशा सोडून दिली होती. ह्या सर्व घटकांसाठी लस ही संजीवनी आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमे दरम्यान येणारे अडथळे हे शास्त्राचा आधार घेऊन सोडविले गेले पाहिजे. कोणतीही घाई करायचे कारण नाही. सर्वात विशेष म्हणजे लसीकरण मोहिमेला घेऊन कुणीही वावड्या उठवू नये.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!
- BLOG | आला थंडीचा महिना, मला लागलाय खोकला!
- BLOG | ये तो होनाही था!
- BLOG | कोरोनाचा सिक्वेल येणार
- BLOG | गुड न्युज! प्रतीक्षा संपली
- BLOG | 2021 : लसीकरणाच्या नावानं चांगभलं!
- BLOG | मृत्यूदर कमी होतोय!
- BLOG | रात्रीच्या संचाराला 'बंदी' का?
- BLOG : मिशन झिरोच्या दिशेने वाटचाल!
- BLOG | हम साथ साथ है!