लसीकरणाचा पहिला दिवस हा जसा बोर्डाच्या परीक्षेचा पहिला दिवस असतो तसाच काहीसा वाटला. परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हॉल तिकिट घेऊन वेळेच्या 30मिनिटे आधी पोचावी तसे लसीकरणाचे पहिल्या दिवसातील लाभार्थी लसीकरण केंद्रावर आपले ओळखपत्र घेऊन पोहचले होते. सर्व जण रांगेत ओळखपत्र दाखवत लसीकरण केंद्रावर प्रवेश करत होते. राष्ट्रीय लसीकरणाचा इतका मोठा कार्यक्रम आहे म्हटल्यावर 'थोडा गोंधळ आणि काही त्रुटी' अपेक्षित होत्याच, त्याप्रमाणे पहिल्याच दिवशीही दिसल्या, कोविन ऍप पहील्याच दिवशी बोंबललं. पहिल्या दिवशीच्या लाभार्थीना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर लसीकरणाचा संदेश ठिकण आणि वेळ कळणे अपेक्षित असताना असं काहीच झालं नाही. त्यामुळे आपल्या नेहमीच्या पद्धतीने यादी घेऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फोना-फोनी करून सर्व लाभार्त्यांना त्यांना त्यांचे वेळ आणि लसीकरण केंद्र कळविले. अनेक लाभार्त्यांना हे फोन लसीकरणाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री पर्यंत येत होते तर काहींना आज लसीकरणाच्या दिवशी दुपार पर्यंत लस घ्यायला यायचं हं ,सांगणारे फोन सुरूच होते. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता, महिला कर्मचाऱ्यांनी केंद्राच्या प्रवेशद्वारावर छानशी रांगोळी काढली होती. लसीकरणाच्या लाभार्थ्यंसाठी रेड कार्पेट आणि अभूतपूर्व सुरक्षित वातावरणात पहिला दिवस पार पडला. आजच्या दिवशी होणाऱ्या चुकांमधून बोध घेत येणाऱ्या काळात लसीकरण मोहिमेची प्रक्रिया आणखी सुखकर होईल अशी अपेक्षा बाळगण्यास काही हरकत नाही.


पहिल्या दिवसाच्या लाभार्थ्यांमध्ये खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी हा कुणी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, टेक्निशियन, वॉर्डबॉय रुग्णालयातील सेवेशी निगडित असाच होता. प्रत्येक लाभार्थी ज्यावेळी केंद्रावर दाखल होत होता, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर लसीकरणाला कमालीची उत्सुकता दिसत होती. दिलेल्या वेळेच्या आधी सर्व लाभार्थी आले होते. त्यांना या केंद्रावर जे टोकन नंबर दिला होता ते हातात घेऊन आपला क्रमांक कधी येणार याची वाट पाहत होता. केंद्रावरील आरोग्य कर्मचारी प्रेमाने लाभार्थ्यांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत होते. लसीकरणासाठी त्यांच्या बूथ वर गेल्यावर परिचारिका त्यांना लसीकरणाची माहिती देऊन पुन्हा कधी यायची माहिती देऊन अलगद दुखणार ह्या पद्धतीने लस टोचत होत्या. त्यांच्या या लस देण्याचं ' कसब ' इतकं भारी होते कि लस घेताना फार लोकांचं तोंड वाकडं झालेले दिसत नव्हते. उलट लस टोचण्याचा कार्यक्रम व्यवस्थित टिपला जावा म्हणून त्याची सेल्फीची धडपड दिसत होती, प्रत्येक जण याबाबतीत यशस्वी होतंच होता असे नाही . लस टोचून झाल्यावर अनेक जण अधिपरिचारिकांबरोबर फोटो काढून 'अंगठा आणि स्मायली देत लसीकरण बूथच्या बाहेर असणाऱ्या विश्रांती कक्षात जाऊन बसत होता. महापालिकेने लस घेतल्यावर अर्धा तास थांबणे बंधनकारक केले होते. सोशल मीडियावर लस घेणाऱ्या फोटोचा रतीब दिवसभर सुरूच होता, त्यामुळे एक अर्थाने जनजागृती होईल आणि त्याची ती कृती फायद्याचीच ठरेल.


नायर रुग्णालयात ज्यावेळी लस देण्याचे काम सुरु करण्यात आले त्यावेळी पहिल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर लस टोचणारी अधिपरिचारिक संजना बावकर या प्रचंड समाधानी दिसत होत्या. त्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी सर्वांना लस देत होत्या. मात्र त्यांना स्वतःला ही लस कधी मिळेल याची माहिती त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी सांगितले की, " ज्यावेळी आमचे नाव येईल तेव्हा आम्ही ती लस घेऊ कारण कधी कुणाचे नाव यादीत येईल हे कुणालाच सांगता येणार नाही. आज मला खूप आनंद आणि समाधान वाटतं शेवटी कोरोनाच्या विरोधातील लस देण्यास सुरुवात झाली आहे. गेली 10 महिने आम्ही कोरोना बाधित रुग्णांना उपचार देत होतो. तो काळ खूप वाईट होता. मात्र आता चांगले दिवस आले आहेत. पहिल्या टप्पा झाल्यानंतर सर्व सामान्य नागरिकांना ही लस देण्यात येईल. त्यामुळे सर्वांचेच आयुष्य सुरक्षित होईल. ही लस कशी द्यावी याचे आम्हाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. लस देण्याच्या आधी आम्ही काही सूचना लस घेणाऱ्या लोकांना देत असतो. लस दिल्यानंतर त्यांना आम्ही अर्ध्या तासाकरिता विश्रांती कक्षात बसायला सांगतो. आजचा दिवस खूपच चांगला आहे. कोणताही लस घेणारा घाबरत नाही उलट आनंदाने सर्वजण लस टोचून घेत आहेत."


मुकेश बारिया, चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून नायर दंत रुग्णालयात कार्यरत आहेत. ते नेहमीप्रमाणे कामावर रुजू होऊन काम करत असताना त्यांना सकाळी दहाच्या सुमारास फोन आला. त्यांना फोनवरून सांगण्यात आले की तुम्हाला आज लस घ्यायला नायर रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर यायचे आहे. त्यांनी तात्काळ गणवेश बदलून बाजूलाच असणाऱ्या लसीकरण केंद्रावर हजेरी लावली. बारिया आपल्या लसीकरणाच्या अनुभवाविषयी माहीती देताना सांगतात, "मला वाटले नव्हते इतका लवकर माझा लसीकरणासाठी नंबर येईल. मी क्षणाचाही विलंब न करता थेट लसीकरण केंद्रावर आलो आणि लस घेतली."


तर मसिना रुग्णालय जनरल सर्जन म्हणून कार्यरत असणारे डॉ मेहदी करझोनी यांना काल शुक्रवारी रात्री १०. ३० च्या सुमारास महापालिकेच्या कार्यलयातून फोन आला की तुम्हाला लस घेण्यासाठी यायचे आहे. " मला तर आश्चर्य वाटले पहिल्याच दिवशी मला लसीकरणासाठी फोन आला. मी त्याचवेळी निश्चित केले होते की लस घ्याचीच आहे. पण वाईट वाटलं की माझी बायको पण डॉक्टर आहे तिला अजून कॉल आलेला नाही. पण पुढे मागे कधी तरी तिलाही कॉल येईलच. मात्र लस सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.


लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लोकांनी आरोग्याच्या या उत्साहात सहभाग नोंदविला होता. लसीला घेऊन काही जणांच्या मनात काही किंतु परंतु होते मात्र याचे प्रमाण फारसे नायर लसीकरण केंद्रावर तरी दिसत नव्हते. बहुतांश सर्वजणांनी मास्क परिधान केला होता, वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे कि अजून काही महिने तरी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेच लागणार आहेत. दोन लसीचा डोस पूर्ण केल्यावरच त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


" कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे सांगतानाच सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीकरणाच्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या कार्यक्रमात केले.बीकेसी येथील कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते होऊन लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. "


महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे यांचे नाव पहिल्या दिवशीच लाभार्त्यांच्या यादीत आले होते. त्यांनी नायर रुग्णालय येथे असणाऱ्या लसीकरण केंद्रावर स्वतः लस घेतली. त्यानंतर ए बी पी माझा डिजिटल शी बोलताना त्यांनी सांगितले की, " सगळ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस गरजेचे आहे. या लसीमुळे आगोदर आरोग्य कर्मचाऱ्यांचं आरोग्य सुरक्षित होईल त्यामुळे ते नागरिकांना सहजपणे उपचार देऊ शकतात. लशीला परवानगी देण्या अगोदर यांच्या अनेक मानवी चाचण्या करण्यात आल्या असून लस सुरक्षित असल्याचे सरकार तर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी असे मी आवाहन करत आहे. कोरोनाचे संकट टळलेलं नाही. त्यामुळे जास्तीत जास्त आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्यांनी ही लस टोचून सुरक्षित व्हावे."

आजच्या पहिल्या दिवशी धारावी येथे म्हणून दिवस रात्र कार्यरत असणारे ३० वर्षापेक्षा अधिक काळ याच ठिकाणी प्रॅक्टिस करणारे स्थानिक डॉ अनिल पाचनेकर यांनी सुद्धा आज लस घेतली. ते सांगतात, मागचे कोरोनाकाळातील धारावी येथील दिवस आठवले कि अंगावर आजही शहारे येतात. धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या संख्येने वाढत होती आम्ही सर्व रुग्णांना विश्वासात घेऊन उपचार करत होतो. त्यावेळी सारखे मनात यायचे कोरोनाविरोधातील लस कधी येईल ? आणि तो दिवस आज उगवला आणि आज ही लस टोचून घेतली. साथीच्या आजारात लस हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. यामुळे या आजाराच्या विरोधातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होणार आहे आणि आपल्याला आजारांपासून लांब राहणे शक्य होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी ही लस घेतली पाहिजे असे माझे मत आहे."


ज्या पद्धतीने लसीकरणाच्या या पहिल्या दिवसाचा गाजावाजा करून ठेवून होता त्यामुळे या दिवसाचं ' इव्हेंट ' होणार होता हे अपेक्षित होतं. ते झालं. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती गेली. आता हा लसीकरणाचा सुरु केलेला कार्यक्रम असाच व्यवस्थित सुरु राहणे अपेक्षित असेल तर कोविन ऍप मधील तांत्रिक दोष लवकरच दूर करून ज्या पद्धतीने प्रत्येक राज्याच्या प्राधान्य क्रमातील नागरिकांची संख्या आहे तेवढे डोस प्रत्येक राज्याला मिळायला हवेत, ती मिळतील अशी अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही. विशेष यामध्ये कोणत्याही आरोग्य कर्मचारी या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण त्यांचे कोरोना काळातील कार्य खूप मोठे आहे आजही ते त्याच ताकतीने कोरोना बाधित रुग्णांना सेवा देत आहेत. आजपासून ऐतिहासिक अशा राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला यश लाभून देशातील तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत ही लस कशी पोहोचेल याचा केंद्र आणि राज्य सरकारने विचार केला पाहिजे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग