सध्या सगळीकडे लसीचे आगमन झाल्याचा अभूतपूर्व आनंद सोहळा देशातील आणि राज्यातील विविध शहरात पाहायला मिळत आहे. गेले अनेक महिने नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीची वाट पाहत होते. तो क्षण आज आला. बहुतांश भागात लसी पोहचल्या असून ठरल्याप्रमाणे 16 जानेवारीला राष्ट्रीय लसीकरण मोहिमेस सुरवात होईल. खरं तर लसीकरण मोहीम देशाला नवीन नाही, यापूर्वी सुद्धा आपल्याकडे लसीकरण मोहीमा घेण्यात आल्या आहेत आणि आजही सुरु आहेत. मात्र कोरोनाच्या या संसर्गजन्य आजाराने ज्या पद्धतीने हाहाकार माजविला होता, त्यामुळे सर्वसामान्याच्या मनात या आजाराने जबरदस्त दहशत निर्माण केली होती. ज्याप्रकारे युद्धात आपल्या समोरील शत्रूचा वध होतो आणि त्यावर आपण विजय मिळवितो तशीच काहीशी भावना सध्या काही नागरिकांमध्ये दिसत आहे. मात्र या सगळ्या प्रकारात लस घेणे हा प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपचाराचा भाग आहे याचे भान सगळ्यांनीच ठेवले पाहिजे. लसीकरणाच्या या वातावरणात शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून त्याच्या वितरणाबाबत सजग राहिले पाहिजे. लसीकरणाच्या अनुषंगाने जोक्स आणि मिम्स बनवून उगाचच अतिउत्साह दाखवून परिस्थितीचे गांभीर्य कमी करता कामा नये. लस बनविण्याकरिता शास्त्रज्ञांनी फार मोठे कष्ट आणि परिश्रम घेतले आहे याची जाणीव ठेवून त्याचा आपण सगळ्यांनी आदर राखला पाहिजे.


कोरोनाच्या या आजारामुळे संपूर्ण जगात आरोग्याची आणीबाणी सारखे वातावरण निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जीव या आजारामुळे गेला आहे. अनके जण या आजाराच्या संसर्गाने बाधित झाले आहेत आणि आजही होत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही. राज्याच्या आरोग्य विभागाच्या 12 जानेवारीच्या आकडेवारीनुसार राज्यात 2,936 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 50 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर 2.54 % एवढा आहे आणि 3,282 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दररोज राज्यात नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण सध्या तरी हजारोंच्या घरात आहे आणि दररोज काही जण मृत्युमुखी पडत आहे. राष्ट्रीय लसीकरण हा एक मोठा कार्यक्रम आहे, पहिल्या टप्प्यातील लोकांना लस मिळण्याकरिता 2-3 महिने लागणार आहे. त्यानंतर सर्वसामान्यांच्या लसीकरणाचे काम सुरु होण्याची शक्यता आहे. लस कोरोना होऊ नये याकरिता आहे. लस कोरोनाचा संसर्ग झाल्यावर त्याच्या उपचाराकरिता नाही हे सर्वानी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनीच अजून काही काळ सुरक्षिततेचे सर्व नियम पाळलेच पाहिजेत.


आज लस प्रत्यक्षात अनेक शहरात दाखल झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्याचे स्वागत केले गेले. या अनोख्या घटनेचे साक्षीदार होण्यास सर्वसामान्य नागरिक मागे कसे राहतील व्हॉट्स अप स्टेटसवर लस दाखल झाल्याचे व्हिडिओ फोटो यानेच जागा घेतली होती. लसीचं स्वागत प्रत्येक शहरात वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आलं. मात्र या सगळ्यांमध्ये बेळगावात लसीचं आगमन आणि त्याचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. बेळगावात लस आणणारं हे वाहन बेळगावच्या व्हॅक्सिन डेपो येथे आणण्यात आलं. तिथं सुहासिनींनी लस आणलेल्या वाहनाची आरती केली. आरती केल्यानंतर वाहनातील लसी तेथील कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात आल्या. बरं स्वागताचा हा उत्साह इतक्यावरच थांबला नाही. लस येण्याच्या आनंदात इथं बँडबाजाचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळं खऱ्या अर्थानं लस, वाजत गाजत आली असं म्हणायला हरकत नाही. कोरोनावर मात करण्यासाठीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सध्याच्या घडीला 1 लाख 47 हजार लसी बेळगावात आल्या आहेत. एखादा खास पाहुणा किंवा खास व्यक्ती घरात पहिल्यांदा प्रवेश करते त्यावेळी त्यांचं वाजत गाजत, उत्साहात किंवा मग आरती ओवाळून स्वागत केलं जातं. सध्या हेच सारं काही केलं जात आहे. पण, कोणा एका व्यक्तीसाठी नव्हे, तर एका लसीसाठी. होय... लसीसाठी.


राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, लसीकरणासाठी आठ लाख लोकांच्या नावाची नोंदणी केली आहे. त्याच्या तुलनेत लसीचे डोस थोडे कमी आले आहेत. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत लस पोहोचेल. तसेच 15 जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस 100 टक्के पोहोचणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत. दोन दिवसांपूर्वी 511 लसीकरण केंद्रासाठी नियोजन केलं होतं. पण काल झालेल्या बैठकीत केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने सूचना दिल्या की, लसीकरण एवढ्या मोठ्या स्तरावर करु नका. कारण लसीकरणासोबतच रुग्णालयातील इतर सेवाही सुरळीत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे केंद्राच्या सूचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्या 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "16 जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रातील दोन रुग्णालयं एक कूपर रुग्णालय आणि दुसरं जालन्यातील जिल्हा रुग्णालय पंतप्रधानांशी यावेळी थेट संवाद साधू शकणार आहेत. अशा प्रकारे 16 जानेवारीला देशासह राज्यात लसीकरणाचं उद्घाटन केलं जाणार आहे."


3 जानेवारी रोजी, ' लस मिळणार कधी ? ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले आहे. त्यामध्ये, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने लसीला परवानगी दिली. लस कशी द्यायची याची रंगीत तालीम झाली. लस साठवून ठेवण्याची जागा ठरली. लस कुठे देणार या आरोग्य केंद्राची यादी तयार झाली. सर्वात अगोदर कोणत्या व्यक्तींना लस द्यायची ते ठरलं. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. मग आता लस टोचणार कधी ? या प्रश्नाचे उत्तर अजून तरी देण्यात आलेले नाही. भारतात दोन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यातील एक आहे लंडन येथील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोव्हिशील्ड लस, याचे उत्पादन पुणे येथील सिरम इन्स्टिटयूट मध्ये करण्यात आले आहे. तर दुसरी आहे कोव्हॅक्सीन लस स्वदेशी बनावटीची भारत बायोटेकने आपल्याच देशात विकसित केलेली आणि त्याचे उत्पादनही हैदराबाद येथेच करण्यात आले आहे. त्यामुळे आता दोन लशींचा पर्याय उपलब्ध असल्याने (येत्या काळात अजून विविध औषध निर्मिती कंपन्यांच्या लस येण्याची शक्यता आहे) सरकार कोणती लस घेतं हे उत्सुकतेचे आहे. लसीकरणाच्या मोहीमेसाठी लसीची मागणी मोठी असल्याने सध्याची परिस्थिती पाहता या दोन्ही कंपन्यांची लस सरकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही लशींच्या प्रतिनिधींनी लसीची उपयुक्तता, परिणामकारकता आणि सुरक्षितता केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञांसमोर सिद्ध केली आहे.


16 जानेवारीला राष्ट्रीय लसीकरणाच्या मोहिमेला आरंभ होईल. पहिल्या दोन -तीन महिन्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या नागरिकांनाच ही लस टोचण्यात येणार आहे. केंद्र सरकारने पराधान्यक्रम ठरविलेला असला तरी काही नागरिक जे ह्या प्राधान्यक्रमात मोडत नाही त्यांनाही लस लवकर मिळावी असे वाटत असले तरी शासनाने सांगितल्या शिवाय कुणीही कुठून अनधिकृतपणे लस विकत घेऊ नये. लसीच्या नावाखाली अनेक बनावट प्रकार बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याचा पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभाग यावर लक्ष ठेवतीलाच. मात्र लसीसाठी कुणाच्याही भुलथापना बळी पडू नका, कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास स्थानिक पोलिसांना कळवा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. लसी संदर्भातील सर्व सूचना नागरिकांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात येणार आहे. लसीच्या शहरातील आगमनामुळे आता लस 'अंगणी ' आली आहे असे म्हणण्यास हरकत नाही आता फक्त लसीकरणाच्या मोहिमेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणे ही आरोग्य व्यवस्थेची मोठी जबाबदारी असणार आहे या कामात नागरिकांनी सहकार्य केल्यास नक्कीच आरोग्य विभागास बळ प्राप्त होईल.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग