(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Soyabin crop : सततचा पाऊस आणि रोगाचा सोयाबीनला फटका, फळ न लागल्यानं पिक उपटून टाकण्याची वेळ
सततचा पाऊस आणि रोगामुळं सोयाबीनच्या पिकाला फटका बसला आहे. सोयाबीनला फळ न लागल्यामुळं पिकं उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Soyabin crop : सध्या सोयाबीन शेतकरी (Soyabin Farmers) अडचणीत सापडला आहे. सततचा पाऊस आणि रोगामुळं सोयाबीनच्या पिकाला फटका बसला आहे. सोयाबीनला फळ न लागल्यामुळं पिकं उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर यलो मोजियाक रोगाचा देखील मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी पिक काढून टाकत असल्याचे चित्र दित आहे. खासकरुन उमरगा तालुक्यातील काही शेतकरी सोयाबीन उपटून टाकत आहेत.
उमरगा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका
उस्मानाबाद जिल्ह्यातील सोयाबीनवर पडलेल्या यलो मोजियाक रोगामुळं फळ लागत नसल्यानं सोयाबीन उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खासकरुन उमरगा तालुक्यातील काही शेतकरी सोयाबीन उपटून टाकत आहेत. पिकावरील रोगामुळं, अति पावसामुळे सोयाबीनला फळ लागत नसल्याचे समोर आलं आहे. पेरणी, फवारणी, खुरपणी इतर मशागतीचा खर्चानं शेतकरी हैराण असताना परत दुसरं संकट या शेतकऱ्यांवर आलं आहे. उमरगा तालुक्यात सतत लागून राहिलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप नुकसान केल्याचे पाहायला मिळत आहे. उडीद, मूग, सोयाबीन या पिकात पाणी थांबल्यानं पिके पिवळी पडून नुकसान होत आहे. त्यासोबतच गोगलगायचा देखील मोठा प्रादुर्बाव झाला आहे. त्यामुळ बऱ्याच ठिकाणी पिकं हाताबाहेर गेली आहेत. उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येथील घुडू मुल्ला या शेतकऱ्याने सोयाबीन झाडाला फळ लागत नसल्यानं ते उपटून टाकले आहे.
अद्याप नुकसान भरपाईच्या यादीत नाव नाही
माझ्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण सोयाबीन पिकं पिवळे पडले आहे. तसेच सोयाबीनला फळ लागले नसल्याची माहिती सोयाबीन उत्पादक शेतकरी घुडू मुल्ला यांनी दिली. सोयाबीनला फळ लागलं नसल्यामुळं मी ते उपटून टाकल्याचे त्यांनी सांगितले. 3 हजार 600 रुपयांची सोयाबीनची पिशवी खरेदी केली होती. तसेच दीड हजार रुपयाचे खत देखील सोयाबीनला टाकले होते. तसेच आता तीन हजार रुपये देऊन सोयबीन उपटून टाकत आहे. अद्याप नुकसान भरपाईच्या यादीत माझं नाव नसल्याची माहिती देखील मुल्ला यांनी दिली.
पावसामुळं अंतर मशागत करता आली नाही
दरम्यान, सततचा पाऊस आणि पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पाऊस लागून राहिल्यानं पिकाची अंतरमशागत देखील करता आली नाही. तसेच फवारण्या देखील केल्या. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण फवारणी केल्यानंतर दोन तास पाऊस न येणं गरजेचं असते. पण लगेच पाऊस आल्यानं फवारणीचा काही उपयोग झाला नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: