(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rice Export : तुकडा तांदळाच्या निर्यात धोरणात सुधारणा, इथेनॉलसह पशुखाद्यासाठी पुरेशी उपलब्धता करण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं देशात पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तुकडा तांदळाच्या निर्यात (Broken Rice Export) धोरणात सुधारणा केली आहे.
Rice Export : केंद्र सरकारनं देशात पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तुकडा तांदळाच्या निर्यात (Broken Rice Export) धोरणात सुधारणा केली आहे. याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे (sudhanshu pandey) यांनी दिली आहे. देशातील कुक्कुटपालन उद्योग तसेच इतर पशुखाद्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या तुकडा तांदळाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तसेच इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी धोरणात सुधारणा केली आहे. दरम्यान, बिगर- बासमती तांदूळ (उकडा तांदूळ) आणि बासमती तांदळाच्या निर्यात धोरणात कोणताही बदल केला नसल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
दरवर्षी देशात सुमारे 50-60 लाख मेट्रिक टन इतका तुकडा तांदळाचे उत्पादन
भारतात दरवर्षी सुमारे 50-60 लाख मेट्रिक टन इतका तुकडा तांदळाचे उत्पादन होते. हा तांदूळ प्रामुख्यानं कुक्कुटपालन आणि इतर जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो. तसेच धान्य आधारित डिस्टिलरीज इथेनॉल तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणूनही त्याचा वापर केला जातो. हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना पुरवलं जातं. तांदळाच्या देशांतर्गत किंमतीत वाढ होत आहे. तांदळाचे सुमारे 10 दशलक्ष मेट्रिक टन कमी उत्पादन होईल असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत 11 टक्के वाढ झाल्यामुळं तांदळाच्या किंमती आणखी वाढू शकतात. मात्र, गेल्या वर्षी 212 लाख मेट्रिक टन निर्यात झाल्यामुळं भारताकडे अतिरिक्त तांदूळ उत्पादन आहे.
9 सप्टेंबर 2022 पासून सुधारणा
तुकडा तांदळाच्या निर्यात धोरणात (HS Code 10064000 अंतर्गत) 9 सप्टेंबर , 2022 पासून सुधारणा केली आहे. अधिसूचना क्रमांक 31/2015-2020 नुसार 'मुक्त' वरुन प्रतिबंधित केले आहे. मात्र, 9 ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी काही बाबतीत शिथिल केले आहे. उदा. जिथे या अधिसूचनेपूर्वी मालाची उचल सुरु झाली आहे, शिपिंग बिल दाखल केले आहे आणि जहाजे आधीच आली आहेत आणि भारतीय बंदरांवर नांगरली आहेत आणि त्यांना या अधिसूचनेपूर्वी रोटेशन क्रमांक दिला गेला आहे. या अधिसूचनेपूर्वी सीमाशुल्क विभागाकडे माल पाठवला आहे. त्यांच्या प्रणालीमध्ये त्याची नोंद झाली आहे.
बिगर- बासमती तांदूळ आणि बासमती तांदळाच्या निर्यात धोरणात बदल नाही
सरकारने उकडा तांदूळ (HS CODE = 1006 30 10) संबंधित धोरणात कोणतेही बदल केलेले नाहीत. जेणेकरुन शेतकऱ्यांना रास्त दर यापुढेही मिळू शकेल. तसेच जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा लक्षणीय वाटा असल्यामुळे आयातीवर अवलंबून असलेल्या गरीब देशांसाठी उकडा तांदूळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल. तसेच बासमती तांदळाच्या निर्यात धोरणात देखील कोणताही बदल केलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या: