Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Maharashtra Rajya Sabha Election : एकीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांसाठी या जागेची मागणी करत असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतील एक गट ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आग्रही आहे.

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीचे मात्र अद्याप काही ठरत नसल्याचं चित्र आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव पुढे आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे, ठाकरेंच्या शिवसेनेतील एक गट ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आग्रही असल्याचं दिसतंय. आता आदित्य ठाकरेंनीही त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यसभेच्या जागेचा अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, मविआच्या नेत्यांमध्ये याची चर्चा सुरू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
येत्या 16 मार्च रोजी राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यातील पाच जागा या महायुतीच्या निवडून येणार हे निश्चित आहे. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्याच जागेवरून आता मविआतील तीनही पक्षांमध्ये चढाओढ असल्याचं दिसतंय.
शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?
राज्यसभेच्या या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे हे आग्रही असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेने ही जागा आमच्यासाठी सोडावी आणि विधानपरिषदेची जागा उद्धव ठाकरेंसाठी घ्यावी अशी ऑफर काँग्रेसने दिली आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या मविआच्या कोट्यातील एका जागेसाठी शरद पवारांच्या नावावर निश्चिती झाल्याच्या काही बातम्या आल्या. त्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं.
अद्याप निर्णय नाही
राज्यसभेच्या जागेचा कुठलाही निर्णय झाला नसून महाविकास आघाडीचे नेते एकत्रित मिळून निर्णय लवकरच घेतील असं आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, पण राज्यसभेच्या जागेवर अद्याप निर्णय झाला नाही. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बसून निर्णय घेतील असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
NCP SCP leaders Supriya Sule ji and Jayant Patil ji met Uddhav Thackeray ji at Matoshri today.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 3, 2026
🚨 No decision has been made on the Rajya Sabha seat as yet, and will be made soon.🚨
All MVA partners will be together for discussions on the seat and the political alignments.
अगदी सुरुवातीपासून आदित्य ठाकरे राज्यसभेची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला न देता आपल्या पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न कर असल्याचं दिसतंय. त्यामुळे या संबंधित वारंवार ते अशाच स्वरुपाची प्रतिक्रिया देत असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचा आग्रह सुरूच
शरद पवारांच्या उमेदवारीबाबत मविआतील तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये एकमत होत असताना आणि शरद पवार यांच्या नावाचा निर्णय होत असताना, अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतील एका गटाकडून ही जागा आपल्यालाच मिळावा यासाठी आग्रह असल्याचं दिसून येतंय.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेनेने शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही बातमी वाचा:

























