Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Israel Iran Conflict : इस्त्रायलने इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं असून इराणची क्षमता संपेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर ट्रम्प यांनीही इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Israel Iran Conflict Update : पश्चिम आशियात तणावाची पातळी झपाट्याने वाढत असताना इराणचे नवे संरक्षण मंत्री माजिद इब्न अल रजा यांचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी ज्या ठिकाणी इराणच्या नव्या नेतृत्वाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होती, त्या ठिकाणालाही इस्त्रायलने लक्ष्य केल्याचं समोर आलं.
दरम्यान, इराणची राजधानी तेहरान आणि कोम शहरात, जिथे नव्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया अपेक्षित होती, त्या ठिकाणी इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले झाल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमधील संसद भवन परिसरालाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांत अनेक सदस्य ठार किंवा जखमी झाल्याचे वृत्त आहे.
सर्वोच्च नेत्याच्या निवडीदरम्यान हल्ला (Supreme Leader Selection Attack)
इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी मतदान सुरू असताना 88 सदस्यांच्या परिषदेवर इस्रायलने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, इराणकडून या दाव्याचे खंडन करण्यात आले असून हल्ल्यापूर्वीच संबंधित इमारत रिकामी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तेहरान आणि बेरूतवर नव्या लष्करी कारवाया (Tehran Beirut Military Strikes)
इस्रायली सैन्याने तेहरान आणि बेरूतमध्ये लष्करी तळांवर नव्याने हल्ले सुरू केल्याची माहिती आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्झ यांनी स्पष्ट केले की, इराणची क्षेपणास्त्र प्रक्षेपण क्षमता पूर्णपणे संपविण्यापर्यंत ही कारवाई सुरू राहील. इस्रायली भूसेना लेबनॉनमधील अधिक रणनीतिक भागांकडे पुढे सरकत असल्याचेही वृत्त आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी (Donald Trump Warning)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत इराणला पुन्हा एकदा इशारा दिला. त्यांनी म्हटलं की, “इराणची एअर डिफेन्स, एअर फोर्स, नेव्ही आणि नेतृत्व व्यवस्था संपुष्टात आलं आहे. ते आता चर्चा करू इच्छितात, पण त्याला खूप उशीर झाला आहे.”
पश्चिम आशियातील या वेगाने बदलणाऱ्या घडामोडींमुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत या संघर्षाचे परिणाम अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
ही बातमी वाचा:
























