Kolhapur News : ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् मृत आजोबा जिवंत झाले, कोल्हापुरातील प्रकार
कोल्हापूर: आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीवघेणे ठरलेले आहेत. पण कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. घरी सर्व पाहूणे जमले, अंत्यविधीची तयारी झाली, त्यानंतर रुग्णालयातून घरी अंतयात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उलपे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होते. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल झाली.
एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले. अंत्यविधीची तयारी झाली. रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले. आणि आज पांडुरंग उलपे तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आलेत. ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक सांगत आहेत.