Avinash Jadhav: संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळ्याचा आरोप; अविनाश जाधवांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं प्रकरण काय?
Avinash Jadhav Letter to Devendra Fadnavis : अविनाश जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सामाजिक न्याय विभागातील अनियमितता आणि प्रशासकीय घोळांची चौकशी करण्याची मागणी केलीय.

Avinash Jadhav Letter to Devendra Fadnavis : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून सामाजिक न्याय विभागातील अनियमितता आणि प्रशासकीय घोळांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विभागातील निधी वितरण, टेंडर प्रक्रिया आणि मंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत गंभीर संशय व्यक्त करत त्यांनी या प्रकरणात तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव भरत कदम यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. तसेच विभागात ओएसडी म्हणून काम करणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना कार्यरत असल्याचा संशयही अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.
Avinash Jadhav Letter to Devendra Fadnavis : निधी वितरण प्रक्रियेत घोळ
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, सामाजिक न्याय विभागात अलीकडील काळात काही गंभीर अनियमितता समोर येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. विशेषतः विविध योजनांमधील निधी वितरण प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि वस्तीगृहाशी संबंधित कामांमध्ये ऑनलाईन टेंडर प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामांचे वाटप झाल्याच्या तक्रारीही समोर येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. याशिवाय मंत्री कार्यालयाचा वापर करून काही कामे देताना आमदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींना टक्केवारीची मागणी केली जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून याबाबत निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी नमूद केले आहे.
Avinash Jadhav Letter to Devendra Fadnavis : निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
तसेच सामाजिक न्याय विभागात ओएसडी म्हणून काम पाहणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना विभागात कार्यरत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या नियुक्तीची आणि अधिकारांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांमुळे सामाजिक न्याय विभागातील प्रशासन आणि निधी वितरण प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आणखी वाचा





















